Indian air force plane

कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे मध्य आशियातील एका देशात अडकलेल्या ५० भारतीय वैज्ञानिकांना सोडवण्यात भारतीय वायू दलाला(Indian air force special mission) यश आले आहे. १९ तासांच्या या स्पेशल मिशनसाठी इंडियन एअरफोर्सच्या सी-१७ ग्लोबमास्टर या मालवाहतूक विमानाचा वापर करण्यात आला. 

कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे मध्य आशियातील एका देशात अडकलेल्या ५० भारतीय वैज्ञानिकांना(50 Indian scientist) सोडवण्यात भारतीय वायू दलाला(Indian air force special mission) यश आले आहे. अडकलेल्या वैज्ञानिकांना परत आणण्यासाठी इंडियन एअर फोर्सने विशेष मोहिम आखली होती. एकूण १९ तासांच्या या स्पेशल मिशनसाठी इंडियन एअरफोर्सच्या सी-१७ ग्लोबमास्टर या मालवाहतूक विमानाचा वापर करण्यात आला.

या वैज्ञानिकांना परत आणण्यासाठी मध्य आशियाई देशातील भारतीय दूतावासाने समन्वयाची महत्त्वाची भूमिका बजावली. यातल्या एका वैज्ञानिकाची प्रकृती गंभीर आहे.  हे शास्त्रज्ञ संशोधनासाठी त्या मध्य आशियाई देशात गेले होते. ज्या देशामध्ये हे शास्त्रज्ञ होते, तिथल्या वैद्यकीय व्यवस्थेवर ताण असल्यामुळे या शास्त्रज्ञांना माघारी आणावे लागले.

आयएएफने या स्पेशल मिशनसाठी सी-१७ ग्लोबमास्टरची निवड केली. कारण या विमानामध्ये भरपूर जागा आहे. कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा या विमानामध्ये उपलब्ध करुन देण्यात आल्या. कोरोनाचा फैलाव झाल्यापासून सी-१७ च्या स्क्वाड्रनला अशा प्रकारची आपात्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी तयार करण्यात आले आहे. नऊ तासाच्या उड्डाणानंतर सी-१७ ग्लोब मास्टर त्या देशात पोहोचले.

त्या देशातील भारतीय अधिकारी सुरक्षितपणे त्या वैज्ञानिकांना विमानतळापर्यंत घेऊन आले होते. विमानतळावर दोन तास थांबल्यानंतर विमानाने माघारी परतण्यासाठी त्यांनी पुन्हा उड्डाण केले. दक्षिण भारतात विमानाने लँडिंग केल्यानंतर वैज्ञानिकांना योग्य त्या ठिकाणी हलवण्यात आले असे सूत्रांनी सांगितले.