joe biden new president of america

सोमवारी झालेल्या मतदानात बायडेन यांना ३०६ तर ट्रम्प यांना २३२ मतं मिळाली. एकूण ५३८ इलेक्टोरल मतांपैकी बहुमतासाठी आवश्यक असणारा २७० चा आकडा बायडेन यांनी सहजरित्या पार केला. ६ जानेवारीला या निकालाची घोषणा सिनेटर्स आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह एकत्रितरित्या करतील.

डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन हे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होणार, यावर आता अंतिम शिक्कामोर्तब झालंय. इलेक्टोरल कॉलेजच्या मतांमध्येदेखील जो बायडेन विजयी झालेत. सोमवारी झालेल्या मतदानात बायडेन यांना ३०६ तर ट्रम्प यांना २३२ मतं मिळाली. एकूण ५३८ इलेक्टोरल मतांपैकी बहुमतासाठी आवश्यक असणारा २७० चा आकडा बायडेन यांनी सहजरित्या पार केला. ६ जानेवारीला या निकालाची घोषणा सिनेटर्स आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह एकत्रितरित्या करतील.

या निकालानंतर जो बायडेन यांनी आपल्याला अंतिम विजय मिळाल्याचं म्हटलंय. आपण पुढचे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष होणार असल्याचं त्यांनी जाहीररित्या घोषित केलंय.

असं होतं मतदान

अमेरिकेत इलेक्टोरल कॉलेज पद्धतीनं मतदान होतं. वेगवेगळ्या भागातून निवडले जाणारे इलेक्टोरल्स त्या त्या राज्यांच्या राजधानीत जमतात. तिथं ते मतदान करतात. ज्या उमेदवाराला २७० पेक्षा अधिक मतं मिळतील, तो विजयी उमेदवार घोषित केला जातो. याची औपचारिक घोणणा ६ जानेवारीला करण्यात येते. दुपारी एक वाजता अमेरिकी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य एकत्र येऊन याची घोषणा करतात.

हा लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया जो बायडेन यांनी दिलीय. यापुढे अमेरिकेत विभाजनवादी राजकारण चालणार नसल्याचे स्पष्ट संकेत मतदारांनी दिल्याचं बायडेन यांनी सांगितलं. २० जानेवारी या दिवशी जो बायडेन हे राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे शपथविधीला हजर राहणार नाहीत, अशी माहिती आहे.