नवे आव्हान- चीनमध्ये कोरोनामुक्त झालेल्या २ व्यक्तींना पुन्हा कोरोनाची लागण

चीनची चिंता आता पुन्हा एकदा वाढली आहे. कारण चीनमध्ये आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. काही महिने कोरोनाचा प्रादुर्भान नसताना चीनमध्ये आता २ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तसेच आधी कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये कोरोना विषाणू जिवंत राहून पुन्हा समोर येण्याची शक्यता आता वाढली आहे. 

चीनमधील हुबेई भागामध्ये राहणाऱ्या ६८ वर्षांच्या महिलेला सगळ्यात आधी कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. सहा महिन्यांपूर्वी ही महिला कोरोनामुक्त झाली होती. तसेच आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्याला एप्रिल महिन्यामध्ये परदेशातून आल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला होता. आता पुन्हा त्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्या दोघांच्या संपर्कात आलेल्या कोणाला अद्याप कोरोनाचा संसर्ग झालेला नाही मात्र खबरदारी म्हणून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

सध्या सगळे देश कोरोनावरील लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे असताना कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोना होत असल्याने एक नवे आव्हान समोर आले आहे. खूप कमी वेळा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना कोरोनाची पुन्हा लागण होते.मात्र चीनमध्ये असे २ जणांच्या बाबतीत घडल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी पडत आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. कोरोनाची पुन्हा लागण होण्याविषयीच्या कारणांची ठोस माहिती अजून मिळालेली नाही.