पाकिस्तानात नवा सत्तासंघर्ष : नव्या आयएसआय प्रमुखांच्या नियुक्तीवरुन पाकचे सेनाप्रमुख बाजवा आणि पंतप्रधान इम्रान खान आमनेसामने, दोघांमध्ये अधिकाराची लढाई

सेनाप्रमुख बाजवा आणि इम्रान खान यांच्यातील तणावाच्या संबंधांवर पारसे भाष्य न करता, आयएसआय प्रमुखांच्या नियुक्तीचा अधिकार हा इम्रान खान यांनाच असल्याचे फवाद चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. आयएसआय प्रमुखपदी जनरल अंजुम यांच्या नियुक्तीवर इम्रान खान आणि जनरल बाजवा यांचे एकमत असल्याचेही सांगण्यास चौधरी विसरलेले नाहीत. लवकरच याबाबत पीएमओ कार्यालयातून अधिकृत घोषणा होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

    इस्लामाबाद : नव्या आयएसआय प्रमुखाच्या नियुक्तीवरुन, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानच्या सेनाप्रमुपख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यातील संघर्ष टोकाला पोहचला आहे. पाकिस्तानी सेनेच्या वतीनं लेफ्टनंट जनरल नदीम अहमद अंजुम यांना नवे आयएसआय प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मात्र सैन्यदलाने घेतलेल्या या निर्णयावर पंतप्रधान इम्रान खान समाधानी नाहीत. ही नाराजी मंगळवारी कॅबिनेट मिटिंगनंतर इम्रान खान मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने पत्रकार परिषदेत बोलून दाखवली. आयएसआय प्रमुखांची नियुक्ती करण्याचा अधिकार, हा केवळ पंतप्रधान इम्रान खान यांना आहे, असे वक्तव्य पाकचे मंत्री फवाद चौधरी यांनी केले आहे. सद्य स्थितीत आयएसआय प्रमुखांच्या नियुक्तीबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही.

    पंतप्रधान इम्रान खान आणि सेनाप्रमुख जनरल बाजवा यांच्यातील संघर्षाची चर्चा पाकिस्तानी मीडियातही रंगू लागली आहे. पंतप्रधानांच्या अधिकारांची जाणीव करुन देणारे मंत्री फवाद चौधरी यांनी या मुद्द्यावर सारवासारवही केली आहे. सेनाप्रमुख बाजवा आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्यातील संबंध चांगले असल्याचे त्यांनी म्हटले आहे, तसेच दोघेही एकमेकांचा सन्मान ठेवत, कोणतेही अनुचित पाऊल उचलणार नाहीत, असेही चौधरी यांनी म्हटले आहे.

    सेनाप्रमुख बाजवा आणि इम्रान खान यांच्यातील तणावाच्या संबंधांवर पारसे भाष्य न करता, आयएसआय प्रमुखांच्या नियुक्तीचा अधिकार हा इम्रान खान यांनाच असल्याचे फवाद चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. आयएसआय प्रमुखपदी जनरल अंजुम यांच्या नियुक्तीवर इम्रान खान आणि जनरल बाजवा यांचे एकमत असल्याचेही सांगण्यास चौधरी विसरलेले नाहीत. लवकरच याबाबत पीएमओ कार्यालयातून अधिकृत घोषणा होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

    सैन्यदलाच्या मीडिया विंगमधून जनरल अंजुम यांची आयएसआय प्रमुखपदी नियुक्ती झाल्याची घोषणा गेल्याच आठवड्यात केली होती. मात्र याबाबत पंतप्रधान कार्यालयातून कोणतीही अधिसूचना अद्यापही निघालेली नाही. पंतप्रधान कार्यालयाने या सर्व स्थितीवर मौन बाळगणेच पसंत केले आहे. आयएसआय प्रमुखांच्या नियुक्तीचा अधिकार हा पंतप्रधानांना आहे, सेनाप्रमुखांशी चर्चेनंतर हा निर्णय होणे अपेक्षित आहे, प्रत्यक्षात मात्र सेनाप्रमुख जनरल बाजवा यांनी परस्पर आयेसआय प्रमुखांच्या नियुक्तीची घोषणा केल्याने अधिकाराच्या मुद्द्यावरुन इम्रान खान नाराज झाले आहेत.