न्यूयॉर्कमध्ये ७० टक्के तरुणांचं लसीकरण पूर्ण, कोरोनाबाबतचे निर्बंध हटणार, लवकरच होणार सेलिब्रेशन

न्यूयॉर्कमध्ये आता सर्व प्रकारचे व्यापार सुरू होतील आणि लवकरच कोरोनापूर्व परिस्थितीत आपण जाऊ, असं क्युमो यांनी म्हटलंय. सर्व दुकानं, खेळांची मैदानं, सामाजिक कार्यक्रम, थिएटर्स, नाट्यगृहं, मॉल्स, बांधकाम व्यवसाय आणि इतर सर्व गोष्टी खुल्या करण्यासाठी परवानगी देण्यात आलीय. लवकरच जोरदार आतषबाजी करून न्यूयॉर्कनं गाठलेल्या या महत्त्वाच्या टप्प्याचं सेलिब्रेशन केलं जाईल, अशी घोषणा क्युमो यांनी केलीय.

    अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्यानं कोरोनाविरुद्धच्या लढाईत एक मोठा पल्ला पार केलाय. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत ७० टक्के तरुणांचं लसीकरण पूर्ण झालं असून हर्ड इम्युनिटीच्या दिशेनं टाकलेलं हे मोठं पाऊल मानलं जातंय. या निमित्तानं कोरोनाबाबतचे अनेक निर्बंध शिथिल करण्याची घोषणा न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यु क्युमो यांनी केलीय.

    न्यूयॉर्कमध्ये आता सर्व प्रकारचे व्यापार सुरू होतील आणि लवकरच कोरोनापूर्व परिस्थितीत आपण जाऊ, असं क्युमो यांनी म्हटलंय. सर्व दुकानं, खेळांची मैदानं, सामाजिक कार्यक्रम, थिएटर्स, नाट्यगृहं, मॉल्स, बांधकाम व्यवसाय आणि इतर सर्व गोष्टी खुल्या करण्यासाठी परवानगी देण्यात आलीय. लवकरच जोरदार आतषबाजी करून न्यूयॉर्कनं गाठलेल्या या महत्त्वाच्या टप्प्याचं सेलिब्रेशन केलं जाईल, अशी घोषणा क्युमो यांनी केलीय.

    बहुतांश ठिकाणी असलेलं मास्क लावण्याचं बंधन हटवण्यात आलंय. मात्र सरसकट सर्व ठिकाणचं बंधन काढण्यात आलेलं नाही. काही महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजेच हॉस्पिटल्स, सार्वजनिक वाहतूक आणि शाळा या ठिकाणी मास्क लावणं बंधनकारक असणार आहे. मात्र इतर सर्व ठिकाणी, विशेषतः गर्दी नसलेल्या ठिकाणी मास्क न लावता फिरण्याची मुभा आता नागरिकांना मिळणार आहे.

    एकेकाळी कोरोनाचा जगातील एक हॉटस्पॉट असणाऱ्या न्यूयॉर्कनं उत्तम नियोजनाच्या जोरावर हा टप्पा गाठलाय. न्यूयॉर्कचं सध्या जगभरातून जोरदार कौतुक होतंय आणि आपल्याकडे असं कधी होईल, असा प्रश्न एकमेकांना विचारला जातोय.