पाकचे नापाक कृत्य ; नवा नकाशा जाहीर करत म्हणे जम्मू काश्मीर आमचाच!

इस्लामाबाद :  नेपाळनंतर आता पाकिस्तानने (Pakistan)आपला नवीन नकाशा (New Map)जाहीर केला असून त्यात त्यांनी  जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) हा स्वतःचा भूभाग असल्याचे दाखविले आहे. आज पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका बैठकीत हा नवा नकाशा लागू केला आहे.  विशेष म्हणजे मागील  वर्षी ५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम  ३७० हटविण्यात आले होते. त्याला उद्या बुधवारी  (५ऑगस्ट )एक वर्ष  पूर्ण होईल. याआधीच पाकिस्तानने जम्मू काश्मीरवर दावा ठोकत भारताला चिथावले आहे.    

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistani Prime Minister Imran Khan)यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर देशाचा नवीन राजकीय नकाशा जाहीर केला आहे.  या नवीन नकाशाला त्यांच्या मंत्रिमंडळाचा आणि संपूर्ण राजकीय नेतृत्वाचा पाठिंबा असल्याचेही खान यावेळी  म्हणाले.  ते म्हणाले की संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचा निर्णय स्वीकारणे म्हणजेच  काश्मीर वादावर तोडगा असून पाकिस्तान त्यासाठी राजकीय आणि मुत्सद्दी प्रयत्न करत राहील. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांच्या म्हणण्यानुसार, या नवीन नकाशामध्ये काश्मीर, सियाचीन आणि सर क्रीकचा वादग्रस्त भाग पाकिस्तानचा भाग असल्याने  तो पाकच्या नकाशात दर्शविण्यात आला आहे. 

या भागांवर ठोकला दावा 

पाकिस्तानाने जाहीर केलेल्या नव्या नकाशात जम्मू-काश्मीरसह लडाख, सियाचीनसह गुजरातच्या जुनागडवर दावा ठोकला आहे.पाकिस्तान कायमच जम्मू-काश्मीर आणि लडाखवर आधीपासूनच आपला दावा असल्याचे म्हणत आहे . मात्र, यावेळी पाकिस्तानने गुजरातच्या जुनागडवरही दावा ठोकला आहे. हा नवा नकाशा आता लवकरच संयुक्त राष्ट्र संघात सादर करणार असल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे. 

 

भारताची प्रतिक्रिया 

दरम्यान, भारताच्यावतीने याप्रकरणी  दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे,  ” आम्ही पाकिस्तानचे  पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर केला पाकिस्तानचा कथित “राजकीय नकाशा” पाहिला आहे . गुजरातच्या सर क्रीक आणि जम्मू-काश्मीर-लडाखवरील दावे निराधार असून या दाव्यांकडे कायदेशीर वैधता किंवा आंतरराष्ट्रीय विश्वसनीयता नाही. खरं तर, हा  प्रकार म्हणजे सीमापार दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या नवीन प्रयत्न आहे.