कुलभूषण जाधव यांना कायदेशीर प्रतिनिधी मिळण्यासाठी पाकिस्तान भारताशी संपर्क साधणार

इस्लामाबाद: बनावट हेरगिरी प्रकरणात अडकलेल्या कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav)  यांना कायदेशीर प्रतिनिधित्व देण्यासाठी पाकिस्तान आता भारताशी संपर्क साधणार आहे. सोमवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली. यामध्ये कुलभूषण यांची बाजू मांडण्यासाठी  कायदेशीर प्रतिनिधीचा मुद्दा उपस्थित  झाला. त्यावेळी सरन्यायाधीश  अतहर मिनल्लाह यांनी पाकिस्तान सरकारला कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) प्रकरणात भारतीय अधिकाऱ्यांना कायदेशीर प्रतिनिधी नेमण्याची परवानगी देण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.दरम्यान, कुलभूषण जाधव प्रकरणाची सुनावणी ३ सप्टेंबर पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. 

नौदलातून निवृत्त झालेले कुलभूषण जाधव इराणमध्ये आपला व्यवसाय करीत होते. त्याचवेळी आयएसआयने तेथून त्यांचे अपहरण केले. कुलभूषण जाधव रॉच्या सांगण्यावरून बलुचिस्तानमधील बंडखोर कारवायांमध्ये सामील असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे.आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) जाधव यांच्या सुटकेसाठी भारताकडून लांबलचक कायदेशीर लढाई सुरु आहे. याचाच भाग म्हणून भारताने राजनैतिक प्रवेश आणि कुलभूषण जाधव यांना कायदेशीर प्रतिनिधीत्व देण्याचा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात उपस्थित केला होता. त्यानुसार  कुलभूषण प्रकरणाची आज पहिल्यांदाच सुनावणी झाली.