इमरान खान यांच्या विमानाला मोदी सरकारकडून परवानगी, श्रीलंका दौऱ्याचा मार्ग मोकळा..,परवानगीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित?

इमरान यांची अध्यक्ष गोटबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्याशी द्विपक्षीय बैठक होणार आहे. यावेळी व्यापार, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण, कृषी, तंत्रज्ञान, संरक्षण आणि पर्यटन या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने सांगितले की, इमरान खान पंतप्रधान राजपक्षे यांनी दिलेल्या निमंत्रणावरून अधिकृत भेटीवर श्रीलंकेला जात आहेत.

    नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा आज २३ फ्रेब्रुवारी रोजी श्रीलंका दौरा नियोजित आहे. या दौऱ्यासाठी त्यांचे विमान भारतीय हवाई क्षेत्रातून उड्डाण करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्यांदाच इमरान खान श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून यावेळी त्यांना मोदी सरकारने परवानगी दिली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार इमरान यांची अध्यक्ष गोटबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्याशी द्विपक्षीय बैठक होणार आहे. यावेळी व्यापार, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण, कृषी, तंत्रज्ञान, संरक्षण आणि पर्यटन या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने सांगितले की, इमरान खान पंतप्रधान राजपक्षे यांनी दिलेल्या निमंत्रणावरून अधिकृत भेटीवर श्रीलंकेला जात आहेत.

    विशेष म्हणजे २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी पाकिस्तानाने नाकारली होती. अमेरिका आणि सौदी अरेबिया दौऱ्यावर नरेंद्र मोदी असताना ही परवानगी नाकारण्यात आली होती. काश्मीरमध्ये मानवाधिकार हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे सांगत पाकिस्तानने भारताला नकार दिला होता. परंतु आता मोदी सरकारने इमरान खान यांना थेट परवानगी दिल्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

    भारताने आंतरराष्ट्रीय नागरी विमानचालन संस्थेसमोर व्हीव्हीआयपी विमानाला परवानगी नाकारण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. सामान्य परिस्थितीत व्हीव्हीआयपी विमानांना उड्डाणासाठी देशांकडून परवानगी दिली जाते. पण पाकिस्तानने परवानगी नाकारणे नियमाचे उल्लंघन असल्याचा आक्षेप भारताने घेतला होता.