फायझर करणार भारताची मदत; सात कोटी डॉलर्सची औषधे पाठवणार

अमेरिकेच्या फायझर या कंपनीने भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. फायझर भारतासाठी तब्बल सात कोटी अमेरिकन डॉलर्सच्या औषधे भारतात पाठवणार आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा सामना करण्यास भारताला मदत मिळणार आहे. याशिवाय लसीसंदर्भातही कंपनी भारताशी चर्चा करत असल्याची माहिती समोर आली आहे.

    दिल्ली : अमेरिकेच्या फायझर या कंपनीने भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. फायझर भारतासाठी तब्बल सात कोटी अमेरिकन डॉलर्सच्या औषधे भारतात पाठवणार आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा सामना करण्यास भारताला मदत मिळणार आहे. याशिवाय लसीसंदर्भातही कंपनी भारताशी चर्चा करत असल्याची माहिती समोर आली आहे.

    कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसलेल्या भारताला संकटाचा सामना करण्यासाठी अमेरिकन फार्मा कंपनी फायझरने मदतीचा हात पुढे केला आहे. कंपनी भारताला सात कोटी डॉलर्सची औषधे पाठविणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलबर्ट बॉरला यांनी ही माहिती दिली.

    याशिवाय आपल्या लसीला भारतात लवकरात लवकर परवानगी देण्यासाठीही सरकारशी चर्चा सुरू असल्याची माहिती बॉरला यांनी लिंक्डीनवरून दिली. आमचा अर्ज महिन्याभरापूर्वीच सादर करण्यात आला आहे. परंतु लसीची भारतात नोंदणी झाली नाही, असेही त्यांनी नमूद केले. आमची भारत सरकारबरोबर चर्चा सुरू आहे. तसेच याला मंजुरी मिळाल्यास देशात याच्या वापरास सुरुवात करता येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.