फ्रान्समध्ये राजदूतच नाही तरीही माघारी बोलावण्याचा प्रस्ताव

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी इस्लामिक दहशतवादाप्रकरणी केलेल्या वक्तव्यामुळे मुस्लीम राष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. अनेक मुस्लीम देशांनी (Muslim Country) याविरोधात मोर्चांचे आयोजन केले आहे. या प्रकरणात पाकिस्तानने जगभरात आपली नाचक्की करुन घेतली आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या वक्तव्याविरोधात संसदेत निंदा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यादरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी (Shah Mahmood Qureshi) यांनी एक प्रस्ताव दिला ज्यात फ्रान्समधून पाकिस्तानी राजदूत परत बोलवण्याचा उल्लेख केला होता.

इस्लामाबाद : फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी इस्लामिक दहशतवादाप्रकरणी केलेल्या वक्तव्यामुळे मुस्लीम राष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. अनेक मुस्लीम देशांनी (Muslim Country) याविरोधात मोर्चांचे आयोजन केले आहे. या प्रकरणात पाकिस्तानने जगभरात आपली नाचक्की करुन घेतली आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या वक्तव्याविरोधात संसदेत निंदा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यादरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी (Shah Mahmood Qureshi) यांनी एक प्रस्ताव दिला ज्यात फ्रान्समधून पाकिस्तानी राजदूत परत बोलवण्याचा उल्लेख केला होता. कुरैशी यांच्या या प्रस्तावावर सर्वांची सहमती बनली. पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षासह विरोधी पक्षांनी या प्रस्तावाला समर्थन दिले. पण, गेल्या तीन महिन्यांपासून फ्रान्समध्ये पाकिस्तानचा राजदूत नाही. राजदूताची बदली करुन त्याला चीनमध्ये पाठवण्यात आले आहे.

सोशल मीडियावर टीकास्त्र

फ्रान्समध्ये आपला राजदूत नाही, याची कल्पना परराष्ट्रमंत्री किंवा पंतप्रधानांना नव्हती का, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. या मुद्द्यावरुन पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. दुसरीकडे जगातही पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. परराष्ट्र मंत्र्यांना आपल्या मंत्रालयाची माहिती नाही का, असा सवाल विचारला जात आहे.

तीन महिन्यापूर्वी पाकिस्तानी राजदूतने सोडले होते पॅरिस

तीन महिन्यापूर्वी पाकिस्तानी राजदूत मोईन-उल-हक यांनी फ्रान्स सोडले होते. त्यांची नेमणूक चीनमधील पाकिस्तानचे राजदूत म्हणून करण्यात आली आहे. तेव्हापासून फ्रान्समध्ये पाकिस्तानचा राजदूत नाही. पाकिस्तानने नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली नाही. पण, फ्रान्समध्ये पाकिस्तानी राजदूत नसल्याची माहिती पाकिस्तानी पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्र्यांना नसल्याने त्यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात असून त्यांचे हसे होत आहे.

कट्टर अनुयायी दर्शविण्याचा कुरैशींचा प्रयत्न

प्राप्त माहितीनुसार, फ्रान्समध्ये पाकिस्तानचा राजदूत नाही, याची माहिती परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांना होती. पण, इस्लामचा कट्टर अनुयायी दाखवण्याच्या प्रयत्नात त्यांनी संसदेला फ्रान्समध्ये आपला राजदूत नसल्याची माहिती सांगितली नाही. प्रस्तावामध्ये पाकिस्तानमधील फ्रान्सच्या राजदूतालाही परत पाठवण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. जर पाकिस्तानने असे केले तर दोन्ही देशांमधील संबंध अधिक ताणले जाण्याची शक्यता आहे.