विषप्रयोगातून वाचलेले पुतिन विरोधक नवेलनी मायदेशी परतणार

ॲलेक्सी नवेलनी  जर्मनीहून पुन्हा मायदेशी परतणार आहेत. १७ जानेवारी २०२१ रोजी त्यांचे मायदेशी आगमन होईल.

मॉस्को. नवेलनीच्या (Navalny) विरोधकांनी त्यांना जिवे मारण्याचा कट रचला होता. यामध्ये रशियन सरकारचा हात असल्याचा संशयही अनेकवेळा व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी ज्यांच्यावर विषप्रयोग केला होता, असे रशियाचे विरोधी पक्षनेते ॲलेक्सी नवेलनी  जर्मनीहून पुन्हा मायदेशी परतणार आहेत. १७ जानेवारी २०२१ रोजी त्यांचे मायदेशी आगमन होईल. ट्वीटरद्वारे त्यांनी याची माहिती  दिली आहे. नवेलनी पुन्हा देशात येणार असल्याचं जाहीर करताच रशियाच्या सत्ताधारी पक्षांच्या गोटामध्ये खळबळ उडाली आहे. पण ॲलेक्सी नवेलनी पुन्हा देशात आल्यानंतर त्यांच्या जीवाला धोका असू शकतो, तसेच त्यांना तुरुंगातही जावं लागू शकतं. हा धोका असतानाही नवेलनीने मायदेशी परतण्याचा विचार केला आहे. पण नवेलनी यांच्या समर्थकांच्या मते ही सत्ताधारी पक्षाची एक चाल आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रशियामध्ये व्लादिमीर पुतिन यांची एकहाती सत्ता आहे. त्यांनी सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम सर्व विरोधक संपवले होते. त्यामुळेचं गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची रशियावर पकड मजबूत बनली आहे. पण अलिकडच्या काही काळात क्रेमलीनमधील (रशियाची संसद) विरोधी पक्षनेते ॲलेक्सी नवेलनी यांनी पुतीन यांच्या सत्तेला हादरे देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांच्यावर विषप्रयोग केल्याचा दावा ॲलेक्सी नवेलनी यांच्या प्रवक्त्याने केला आहे.

गेल्या वर्षी रशियामध्ये असताना नवलेनी यांच्यावर प्राणघातक विषप्रयोग झाला होता. ते काहीकाळा कोमामध्येही गेले होते. नोव्हिचोक नर्व्ह एजंट नावाचं विष त्यांना देण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांना जर्मनीत उपचारासाठी नेण्यात आलं त्यामुळेच त्यांचा जीव वाचू शकला.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रशियाच्या पश्चिम प्रांतातून मॉस्कोकडे रवाना होत असताना, विमानातचं त्यांना विष देण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि ते खाली कोसळले. बेशुद्धावस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. यावेळी नवलेनीच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, त्यांना प्राणघातक विष देण्यात आलं होतं. पुढे उपचारासाठी त्यांना जर्मनीत नेण्यात आलं होतं.