
गेल्या अनेक शतकांपासून जुन्या धार्मिक परंपरामध्ये अडकलेल्या सौदीने सुधारणांच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुरुष आणि महिला आता सारख्याच पदासाठी अर्ज दाखल करु शकणार आहेत
रियाध- मुस्लीम देश असणारा सौदी अरेबिया मोठे सामाजिक बदल करताना दिसत आहे. महिलांना मर्यादीत हक्क देणारा सौदी आता त्यांच्यासाठी अनेक दारे उघडत आहे. सिनेमा, ख्रिस्मस सेलिब्रेशन, महिलांना गाडी चालवण्याची परवानगी दिल्यानंतर सौदीने आता महिलांच्या लष्करातील सहभागाचा मार्ग खुला केला आहे. एका मुस्लीम राष्ट्राने घेतलेला हा निर्णय अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. एका इंग्रजी वृत्तसंस्थेने यासंदर्भातील माहिती दिली.
सौदी अरेबियातील महिला रॉयल आर्मी, नेव्ही, एअर फोर्स आणि आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिस जॉईन करु शकणार आहेत.
गेल्या अनेक शतकांपासून जुन्या धार्मिक परंपरामध्ये अडकलेल्या सौदीने सुधारणांच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुरुष आणि महिला आता सारख्याच पदासाठी अर्ज दाखल करु शकणार आहेत. महिलांना आता सैनिक, लान्स कॉर्पोरल आणि सार्जेंट पदासाठी अर्ज दाखल करता येणार आहे.
मोहमद सलमान यांनी आधुनिक जगासोबत स्पर्धा करण्यासाठी उचलले हे पाऊल देशातील पुराणमतवादी लोकांना सहजासहजी मान्य होण्यासारखे नाही. असे असले तरी राज्यकर्त्यांनी धरलेली प्रगतीची कास कौतुकास्पद आहे. दुसरीकडे इराणसारखे देश वेगळ्या मार्गाने जात असल्याचं दिसत आहे. इराणचे सर्वोच्च नेता अयातोल्ला खामेनी यांनी फतवा काढला असून कार्टूनमध्ये दाखवल्या जाणाऱ्या महिलांनाही हिजाब दाखवणे बंधनकारण केले आहे. महिलांच्या पेहरावावर अनेक बंधने आणण्यात आली आहेत.तसेच नियमांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उचलला जात आहे.