समलैंगिक दाम्पत्यांसाठी धक्का; व्हॅटिकनच्या धार्मिक संस्कार मंडळाने घेतला आशीर्वाद न देण्याचा निर्णय

विवाहाच्या संबंधी पूर्वपार काही नियम ठरवण्यात आले आहेत, त्यामध्ये समलैंगिक दाम्पत्यांसाठी ढवळाढवळ करता येणार नाही. हा कोणताही भेदभावाचा मुद्दा नाही, तर विवाहसंबंधी ठरवून दिलेल्या धार्मिक संस्कारांचा विषय आहे. पुरुष आणि स्त्री यांच्या विवाहाला धर्मानुसार मान्यता देण्यात आली आहे, समलैंगिकांसाठी नाही.

    जगात ख्रिस्ती धर्मामध्ये विवाह संस्कारासाठी चर्चची भूमिका महत्वाची मानली जाते. पाद्री, बिशप यांच्या आशिर्वादाशिवाय विवाहाला मान्यता मिळत नाही. मात्र जगभरातील चर्चवर धार्मिकदृष्ट्या नियंत्रण असलेल्या व्हॅटिकनच्या धार्मिक संस्कार मंडळाने समलैंगिक दाम्पत्यांना आशीर्वाद दिला जाणार नाही, कारण धर्मात ठरवून दिलेल्या नियमांच्या ते विरोधात आहे, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे एकप्रकारे पाश्चात्य ख्रिस्ती देशांसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. मात्र याला अमेरिका आणि पश्चिम युरोपातून विरोध होऊ लागला आहे.

    सध्या अमेरिका आणि पश्चिम युरोपात समलैंगिक संबंधांना मान्यता देण्यात आली आहे, तसेच अमेरिका, जर्मनी आणि पॅरिस येथील चर्च समलैंगिक दाम्पत्यांना आशीर्वाद देतात, मात्र पूर्व युरोप, आफ्रिका आणि आशियातील चर्चमध्ये याला मान्यता नाही. व्हॅटिकनच्या या भूमिकेमुळे जगभरातील १.३० अब्ज लोकसंख्या असलेल्या ख्रिस्ती धर्मियांसाठी आता ही एकप्रकारे मर्यादा समजली जाणार आहे.

    विवाहाच्या संबंधी पूर्वपार काही नियम ठरवण्यात आले आहेत, त्यामध्ये समलैंगिक दाम्पत्यांसाठी ढवळाढवळ करता येणार नाही. हा कोणताही भेदभावाचा मुद्दा नाही, तर विवाहसंबंधी ठरवून दिलेल्या धार्मिक संस्कारांचा विषय आहे. पुरुष आणि स्त्री यांच्या विवाहाला धर्मानुसार मान्यता देण्यात आली आहे, समलैंगिकांसाठी नाही. अमेरिका आणि जर्मनी येथील काही कॅथॉलिक चर्चने समलैंगिक विवाहासाठी आशीर्वाद देण्यास सुरुवात केली आहे, त्यांना तो अधिकार देण्यात आला नाही. कोणत्याही चर्चमध्ये समलैंगिक दाम्पत्यांना दिलेला आशीर्वाद हा धार्मिकदृष्ट्या ग्राह्य धरला जाणार नाही. त्याचबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे, विवाहबाह्य संबंध ठेवणार यांनाही त्यांच्या एकत्रित जीवनासाठी आशीर्वाद देण्याची परवानगी धर्मात नाही, असे मत व्हॅटिकनचे पोप फ्रान्सिस यांनी व्यक्त केले आहे.

    परंतु व्हॅटिकनचे पॉप फ्रान्सिस यांनी २०१३ मध्ये समलैंगिक संबंधाचे समर्थन केले होते, असा दावा समलैंगिक समुदाय करत आहे. समलैंगिकांबाबत मत मांडणारा मी कोण आहे?, असे पॉप फ्रान्सिस म्हणाले होते. समलैंगिकांना स्वतःचे कुटुंब निर्माण करण्याचा अधिकार आहे. ते देवाचीच मुले आहेत, त्यामुळे त्यांना त्यांची कुटुंब बनवण्याचा अधिकार आहे. त्यांना कुणीही मुख्य सामाजिक धारेतून दूर करू शकत नाही. त्यानंतर व्हॅटिकनने याचा खुलासा करताना, पॉप फ्रान्सिस यांची विधाने तोडूनमोडून प्रसिद्ध करण्यात आली. त्यांनी समलैंगिक संबंधांना मान्यता दिलेली नाही.

    गे कॅथॉलिक ग्रुपचे संचालक फ्रान्सिस बेनार्डो यांनी याला विरोध केला आहे. व्हॅटिकनची ही भूमिका आम्हाला अपेक्षित होती, व्हॅटिकनने समलैंगिक समुदायाचे हक्क नाकारणे अत्यंत खेदजनक आहे, असे बेनार्डो म्हणाले.