अमेरिकेत हाहाकार! तीन विविध मसाज पार्लरवर गोळीबार; ४ महिलांसह ८ ठार

चेरोकी काऊंटीच्या गोळीबारातील संशयिताला अटलांटामधील दक्षिणेच्या क्रिस्प काऊंटी येथून ताब्यात घेतले आहे. त्याचे नाव रॉबर्ट ऐरन लॉन्ग असे असून वय २१ वर्षे आहे.

    वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अटलांटामध्य़े तीन विविध मसाज पार्लरवर झालेल्या गोळीबारात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती जखमी आहे. यामध्ये ज्या दोन स्पामध्ये गोळीबार झाला ते एकमेकांसमोर आहेत तर तिसरा स्पा हा चेरोकी काऊंटीमध्ये आहे. या दोन्ही ठिकाणच्या घटना एकाच वृत्तीतून आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत. अद्याप हल्ल्याचे कारण समजले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    चेरोकी काऊंटीच्या गोळीबारातील संशयिताला अटलांटामधील दक्षिणेच्या क्रिस्प काऊंटी येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचे नाव रॉबर्ट ऐरन लॉन्ग असे असून वय २१ वर्षे आहे. जॉर्जियाच्या यंग्स एशियन मसाजवर गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी अधिकारी दाखल झाले आहेत, त्यांना पाचजण जखमी अवस्थेत सापडले आहेत. दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

    चार आशियाई महिलांचा समावेश

    या घटनेच्या एक तासाने अटलांटा पोलिसांना ‘गोल्ड मसाज स्पा’मध्ये दरोडा पडल्याची खबर मिळाली. पोलीस जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या ‘अरोमा थेरेपी स्पा’ मध्ये गोळीबार झाल्याचे समजले. येथेही एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिला आहेत, ज्या आशियाई दिसत आहेत. या स्पासोबत त्यांचे काय संबंध होते हे आताच सांगणे कठीण असल्याचे अटलांटा पोलिसांनी सांगितले.