तालिबान्यांची भारतीय दूतावासात घुसखोरी; कागदपत्रे, कार घेऊन गेले

जलालाबाद आणि काबुलमधल्या भारतीय दूतावासाबद्दल काही माहिती मिळालेली नाही. दुसऱ्या देशांच्या रिकाम्या दुतावासामध्ये प्रवेश करू नका तसेच तिथे उभ्या असलेल्या गाड्यांना हात लावू नका, असे तालिबानी नेतृत्वाने या आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या सैन्याला सांगितले होते. मात्र, तरीही भारतीय दूतावासामध्ये शोध घेण्यात आला. यावरून तालिबानच्या बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये फरक असल्याचे स्पष्ट झाले आहे. अफगाणिस्तानात भारताचे चार दूतावास आहेत. यात कंदहार, हेरात आणि मझार-ए-शरीफचा दूतावास बंद आहे.

    काबूल : तालिबानने कंदहार आणि हेरातमधल्या भारतीय दूतावासात घुसखोरी करीत तेथे धुडगूस घातल्याचे वृत्त आहे. भारताने हे दोन्ही दुतावास सध्या बंद केले आहेत. तालिबानने या दोन्ही दुतावासामध्ये शिरून कागदपत्रे शोधण्याचा प्रयत्न केला. ते या दोन्ही दुतावासात पार्क केलेल्या गाड्या घेऊन निघून गेलेत. कंदहार आणि हेरातमधल्या दुतावासातून तालिबानने काही गोष्टी शोधून काढण्याचा प्रयत्न केल्याची गुप्तचरांची माहिती आहे.

    तालिबानच्या बोलण्यात आणि कृतीत फरक

    जलालाबाद आणि काबुलमधल्या भारतीय दूतावासाबद्दल काही माहिती मिळालेली नाही. दुसऱ्या देशांच्या रिकाम्या दुतावासामध्ये प्रवेश करू नका तसेच तिथे उभ्या असलेल्या गाड्यांना हात लावू नका, असे तालिबानी नेतृत्वाने या आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या सैन्याला सांगितले होते. मात्र, तरीही भारतीय दूतावासामध्ये शोध घेण्यात आला. यावरून तालिबानच्या बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये फरक असल्याचे स्पष्ट झाले आहे. अफगाणिस्तानात भारताचे चार दूतावास आहेत. यात कंदहार, हेरात आणि मझार-ए-शरीफचा दूतावास बंद आहे.

    हिंदू, शिख समदुायाला सुरक्षिततेचे आश्वासन

    अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांक विशेषत: हिंदू आणि शीख धर्मीयांना शरण आणि सुरक्षा देण्याचे आश्वासन तालिबानने दिले आहे. अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख एकदम सुरक्षित असतील, असे तालिबानने म्हटले आहे. तालिबानने काबूल येथील गुरुद्वारा कमिटीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी आश्वास्त केले. हिंदू आणि शिखांना कोणताही त्रास दिला जाणार नाही. त्यांना पूर्ण सुरक्षाही दिली जाईल, असे तालिबानने सांगितले. तालिबानच्या भीतीने काबूलमधील गुरुद्वारात 200 पेक्षा अधिक नागरिकांनी आश्रय घेतला होता. यामध्ये सर्वाधिक हिंदू आणि शिखांचा समावेश होता. त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तालिबानने गुरुद्वारा कमिटीसोबत बैठक घेऊन चर्चा केली. त्यांना आश्वस्त करत, कोणताही त्रास देणार नसल्याचे सांगितले.