The existence of aliens at the bottom of the sea; Picture of a 'flying saucer' captured by US troops

वॉशिंग्टन :  अमेरिकन सैन्याला अटलांटिक समुद्रावर क्यूबच्या आकाराची एक रहस्यमय वस्तू उडताना दिसून आली. अमेरिकन संरक्षण मंत्रालयाच्या लीक झालेल्या दोन गोपनीय अहवालामध्ये या रहस्यमय वस्तूचे छायाचित्र समोर आले आहे. लीक झालेल्या एका फोटोमध्ये चांदीसारखी दिसणारी ही क्यूबसारखी वस्तू अटलांटिक समुद्रावर उड्डाण घेत असल्याचे दिसते.

यूएफओ दिसण्याची ही घटना २०१८ आणि याच वर्षातील आहे असे सांगितले जाते. ही छायाचित्रे अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणांना मोठ्या प्रमाणात शेअर केली होती. यासंदर्भातील संपूर्ण अहवाल अनाइडेन्टीफाईड एरियल फेनोमेना (यूएपी) टास्क फोर्सने तयार केला आहे. परग्रहावरील मानवाचे अस्तित्व समुद्रतळाशी असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अहवालानुसार एक रहस्यमयी वस्तू समुद्रातून निघाली आणि आकाशात उड्डाण घेऊ लागली होती. ही वस्तू परग्रहावरील असल्याची शक्यता नाकारता येत नाही असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. ब्रिटिश तज्ज्ञ निक पोप यांनी हा खुलासा असाधारण असल्याचे म्हटले. या खुलाशाने पडद्यामागील शोधच समोर आले नाही तर अमेरिकन सरकार यूएफओबाबत कसे संशोधन करीत आहे हे सुद्धा उघड झाले आहे.

३० हजार फुटावर उड्डाण

निक यांनी याबाबत अनेक खुलासे होऊ शकतात असेही म्हटले आहे. या खुलाशावर अमेरिकन संरक्षण मंत्रालयाने अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही. लिक झालेले हे फोटो द डिब्रीफमध्ये प्रकाशित झले होते. त्यात संरक्षण मंत्रालय आणि गुप्तचर यंत्रणांचा दाखला दिला होता. हा फोटो अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर अमेरिकन वायुदलाच्या एका वैमानिकाने कॅमरात कैद केला होता. रहस्यमय तबकडी समुद्रापासून ३० ते ३५ हजार फूट उंचीवर उडत होती.

संरक्षण मंत्रालयही बुचकाळ्यात

या तबकडीचे चित्र एफ/ए-१८ लढाऊ विमानात मागील सीटवर बसलेल्या वैमानिकाने घेतले आहे असे दिसते. ही छायाचित्रे पाहून तज्ज्ञांनीही आश्चर्य व्यक्त केले. जीपीएस डिव्हाईस सारखी दिसणारी ही वस्तू असल्याचे त्यांनी म्हटले. तथापि या चित्रामध्ये जीपीएस ट्रान्सपाँडर मात्र नाही. एवढेच नव्हे तर ही रहस्यमय वस्तू आकाशात भरारी घेत असल्याचेही दिसले आहे. काही तज्ज्ञांनी तर ही वस्तू म्हणजे हवामानाचा अंदाज घेण्यासाठीही एक प्रयत्न असू शकतो असे म्हटले आहे. तथापि सर्व दावे प्रतिदावे पाहू जाता अमेरिकन संरक्षण मंत्रालय मात्र बुचकाळ्यात पडले आहे.

त्रिकोणी विमानसदृश वस्तू

अमेरिकन संरक्षण मंत्रालयाच्या अहवालात ही रहस्यमय वस्तू एलियननेच तयार केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अहवालानंतर पुन्हा एक सुधारित अहवाल जारी करण्यात आला. त्यात ही वस्तू हवा आणि पाण्याच्या आतही उडण्यास सक्षम असल्याचे नमूद करण्यात आले.  प्रकाशित झालेल्या छायाचित्रानुसार ही अज्ञात वस्तू समुद्रातून निघाली आणि हवेत उडत असताना दिसते.या वस्तूच्या प्रत्येक कोपऱ्यातून पांढरा प्रकाशही बाहेर पडत होता असेही दिसून येते. ही रहस्यम वस्तू दिसण्यास हे त्रिकोणी विमानासारखेच भासते. यापूर्वी २०१७ मध्ये नौदलाचे कमांडर डेव्हीड फ्रेवर यांनी प्रशांत महासागरात एक रहस्यमय वस्तू पाहिल्याचा दावा केला होता. त्यावेळी त्यांनी त्या वस्तूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु अत्यंत वेगाने ही वस्तू डोळ्यासमोरून ओझर झाली असे ते म्हणाले होते.