EU च्या ‘ग्रीन पास’ यादीत ‘कोविशिल्ड’ लसीचा समावेश नाही ; EMA ने सांगितलं कारण

ग्रीन पास मिळवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसीच्या यादीत भारतातील कोविशिल्ड लसीचा समावेशच केलेला नसल्यानं समस्या निर्माण झाली आहे.युरोपियन मेडिसिन एजन्सी अर्थात EMA ने ग्रीन पास यादीत कोविशिल्ड नसण्याच्या कारणांवर भाष्य केलं. “कोविशिल्ड लस अॅस्ट्राझेनेकाच्याच वॅक्सझेवरियाच्याच फॉर्म्युल्याने तयार करण्यात आलेली असली, तरी कोविशिल्ड लसीला सध्या युरोपातील राष्ट्रांमध्ये परवानगी मिळालेली नाही.

    ‘कोविशिल्ड’ लसीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ही लस घेतलेल्यांना युरोपियन देशात जाणे कठीण होणार आहे, कारण कोविशिल्ड लसीला युरोपियन युनियनने मंजुरीच दिलेली नाही. त्यामुळे ग्रीन पास मिळणं कठिण झालं असून, भारतातून युरोपातील देशात जाण्यात समस्या निर्माण होणार आहेत. यासंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तर तिकडे युरोपियन मेडिसिन एजन्सी अर्थात EMA ने कोविशिल्ड लस ग्रीन पास यादीत नसण्याच्या कारणाचा खुलासा केला आहे.

    काय आहे ग्रीन पास

    युरोपियन युनियनने ग्रीन पास पद्धती सुरू केली आहे. यात युरोपियन मेडिसिन एजन्सीने (EMA) काही लसींना मंजुरी दिलेली आहे. मंजुरी दिलेली लस घेतलेल्या परदेशी प्रवाशांनाच युरोपमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असणारा ग्रीन पास दिला जाणार आहे. हा ग्रीन पास मिळाल्यानंतर ती व्यक्ती युरोपातील २७ देशांमध्ये जाऊ शकते. ही ग्रीन पास पद्धती १ जुलैपासून संपूर्ण युरोपात लागू केली जाणार आहे. तर स्पेन, जर्मनी, ग्रीस, पोलंड आदी देशांनी याची अमलबजाणी सुरू केली आहे.

    ‘कोविशिल्ड’ लसीचा समावेश नाही
    दरम्यान, ग्रीन पास मिळवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसीच्या यादीत भारतातील कोविशिल्ड लसीचा समावेशच केलेला नसल्यानं समस्या निर्माण झाली आहे.युरोपियन मेडिसिन एजन्सी अर्थात EMA ने ग्रीन पास यादीत कोविशिल्ड नसण्याच्या कारणांवर भाष्य केलं. “कोविशिल्ड लस अॅस्ट्राझेनेकाच्याच वॅक्सझेवरियाच्याच फॉर्म्युल्याने तयार करण्यात आलेली असली, तरी कोविशिल्ड लसीला सध्या युरोपातील राष्ट्रांमध्ये परवानगी मिळालेली नाही. उत्पादन होत असलेल्या ठिकाणं वेगळी असल्यानं अंतिम उत्पादनातही फरक असू शकतो” असं युरोपियन मेडिसिन एजन्सीचे माध्यम अधिकारी झाला ग्रु्दनिक यांनी दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. युरोपियन कायद्यानुसार लसीला परवानगी मिळवण्यासाठी उत्पादन होत असलेल्या ठिकाणीला भेट देऊन लस निर्मिती प्रक्रियेची पाहणी केली जात. लसीला मंजुरी देण्यातील हा महत्त्वाचा भाग आहे.