पाकिस्तानात एक कप चहाची किंमत ऐकाल तर उडाल, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक आणि दुकानदार हैराण

भारतातून साखर आयात न करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे, त्यामुळे स्वस्तात साखर मिळणे देशात अवघड झाले आहे. सरकारच्या या आडमुठीपणाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतोय.

  इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये महागाईमुळे पाक नागरिकांचे जीणे अवघड करुन टाकले आहे. रावळपिंडीत एक कप चहासाठी मोजावे लागणारी किंमत ऐकली तर तुम्ही चक्रावून जाल. साध्या कपभर चहासाठी इथे तब्बल ४० रुपये मोजावे लागत आहेत. साखर महाग असल्याने, चहाला इतके रुपये मोजावे लागत आहे, याला इम्रान खाग यांचे सरकार जबाबदार आहे.

  भारतातून साखर आयात न करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे, त्यामुळे स्वस्तात साखर मिळणे देशात अवघड झाले आहे. सरकारच्या या आडमुठीपणाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतोय.

  पाकिस्तानातील वृत्तपत्र डॉनने एका चहावाल्याने दिलेल्या माहितीच्या आधारे लिहिले आहे की, पूर्वी एक कप चहाची किंमत ३० रुपये होती आता ती वाढून ४० रुपये झाली आहे. ही वाढ गेल्या काही दिवसांतील आहे. चहापत्ती, साखर, दूध आणि गॅसचे दर वाढल्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये साध्या कपभर चहाच्या किमतीत गगनाला भिडल्या आहेत.

  डॉनच्या वृत्तान सार दूधही १०५ रुपये प्रतिलिटरहून १२० रुपये प्रतिलिटरवर पोहचले आहे. भारतातील दुधाच्या दरापेक्षा पाकिस्तानचे हे दर सुमारे दुप्पट आहेत. त्यातच चहापत्ती, साखर आणि गॅस सिंलिंडरचे भावही वाढले आहेत. याचा थेट परिणाम चहावाल्यांच्या कमीवर झाला आहे. त्यामुळे चहाचे दर वाढविण्यापलिकडे कोणताही पर्याय त्यांच्यापुढेही राहिलेला नाही.

  अब्दुल अजीज नावाच्या एका चहा दुकानदाराने सांगितले की त्याची दररोजची कमाई २६०० रुपये इतकी होती, मात्र गेल्या काही दिवसात महागाईमुळे नफ्याचा विचार केला तर दिवसाला फक्त १५ रुपयांचे उत्पन्न होते आहे. त्यामुळे चहाचे दर वाढविण्यापलिकडे पर्याय नसल्याचे त्याने सांगितले आहे.

  एक कप चहाला ४० रुपये मोजावे लागत असल्याने दिवसाला तीन, चार कप चहा पिणारे ग्राहकही आता एका कपापेक्षा जास्त चहा पिण्यास तयार नसल्याने त्याचा फटका व्यवसायालाही बसत आहे.