crime

एका १७ वर्षीय अल्पवयीन तरूणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अमेझॉनसमध्ये घडली आहे. या तरूणीला आपल्या हत्येची कल्पना एक दिवस आधीपासूनच होती. असं चित्र तिने सोशल मीडियावर केलेल्या लिखाणातून समोर आलं आहे.

    ब्राझिलिया : ब्राझीलमध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन तरूणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अमेझॉनसमध्ये घडली आहे. या तरूणीला आपल्या हत्येची कल्पना एक दिवस आधीपासूनच होती. असं चित्र तिने सोशल मीडियावर केलेल्या लिखाणातून समोर आलं आहे.

    मृत तरूणीचं नाव ख्रिश्चन गुमेरस असं आहे. ख्रिश्चननं आपल्या मृत्यूच्या एक दिवस आधी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. त्यात तिनं सगळ्यांना गुडबाय म्हटलं आहे. तसेच आता मी लवकरच मरणार आहे. असं तिनं पोस्टमध्ये लिहिलं होतं. परंतु पुढं तिनं लिहिलं, की ड्रग्ज डीलर्सकडून मी जवळपास ४०,४३७ रुपये उधार घेतले होते. ही रक्कम मला चुकवता येत नाही. आता या प्रकरणातूनच माझी हत्या होणार आहे. विशेष म्हणजे हत्येनंतर आपला मृतदेह कुठं सापडेल हेसुद्धा तिनं लिहून ठेवलं होतं.

    या गंभीर पोस्टनंतर ख्रिश्चनची दुसऱ्या दिवशी खरोखरच हत्या झाली आणि त्यानंतर तिच्या अकाऊंटवरून अजून एक पोस्ट करण्यात आली. यामध्ये मृतदेह कुठं आहे ते सांगितलं होतं. परंतु ही पोस्ट खून करणाऱ्यानं ख्रिश्चनच्या प्रोफाईलवरून केल्याचं समजलं जात आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ख्रिश्चन हरवल्याची माहिती १२ फेब्रुवारीलाच मिळाली होती. मात्र पोलीस घटनास्थळावर पोचण्याआधीच तिची हत्या करण्यात आली. हत्या करणाऱ्यानं १३ फेब्रुवारीला ख्रिश्चनला गोळी मारली. पोलिसांचं म्हणणं आहे, की कमांडो वॉर्मेल्हो या गँगचा ख्रिश्चनच्या हत्येशी काही संबंध नाही. आरोपींनी पोलिसांना चकवा देण्यासाठी या गॅंगचं नाव घेतलं आहे. लवकरच पोलीस त्या आरोपींना पकडतील असं त्यांनी म्हटलं आहे.