काय सांगता ? लवकरच कळणार ‘एलियन्स’च्या अस्तित्वाबाबतची माहिती ; अमेरिका येत्या २५ जूनला सादर करणार रिपोर्ट

स्विनबर्न विद्यापीठातील खगोल संशोधिका रिबेका एलन यांनी सांगितले की, आपल्या आकाशगंगेतच शंभर अब्जांपेक्षा अधिक ग्रह असून, सुमारे सहा अब्ज ग्रहांकडे ते पृथ्वीसद‍ृश असावेत म्हणून पाहिले जाते. त्यामुळे पृथ्वीशिवाय अन्यत्रही जीवसृष्टी असणे शक्य आहे; पण अद्याप त्याची पुष्टी झालेली नाही इतकेच! अर्थात, आपण 'एलियन' म्हणतो त्यावेळी आपल्या डोळ्यांसमोर मानवासारखीच आकृती उभी राहते.

  एलियन्स म्हणजेच परग्रहवासीयांच्या अस्तित्वाबाबत अनेकदा सगळ्यांच कुतूहल असते. आपल्या सारखेच जीव दुसऱ्या ग्रहावर आहेत का याबाबत अनेक देश संशोधन करत आहेत. अमेरिकेचे लष्करी मुख्यालय ‘पेंटॅगॉन’च्या ‘अनआयडेंटीफाईड एरियल फेनोमेना (यूएपी) टास्क फोर्स’कडून या महिन्याच्या अखेरीस एलियन्स म्हणजेच परग्रहवासीयांच्या अस्तित्वाबाबतचा रिपोर्ट येणार आहे. हा रिपोर्ट २५जूनला येईल, असा अंदाज आहे. या दस्तावेजावरून हे समजू शकेल की, अमेरिकन सरकारला एलियन्स आणि ‘युफो’ (उडत्या तबकड्या) यांच्याबाबत कोणती माहिती आहे. याबाबत पाच संशोधकांना काय वाटते याबाबत सांगण्यात आले आहे.

  स्टिव्हन टिंगे : कर्टिन विद्यापीठातील रेडिओ खगोल विज्ञानाचे प्रोफेसर स्टिव्हन यांनी सांगितले की, परग्रहांवर जीवाणूंसारख्या सूक्ष्म जीवांच्या रूपातच जीवसृष्टी आहे की, आपल्यासारखी प्रगत जीवसृष्टीही तिथे आहे, या प्रश्‍नाचे उत्तर ‘एलियन’मध्येच मोडते असे आहे. ‘एलियन्स’चा अर्थ पृथ्वीशिवाय अन्य ग्रहांवर कोणत्याही स्वरूपात असलेले जीवन. मात्र, पृथ्वीशिवाय अन्यत्र कुठेही साधा जीवाणूसारखा सूक्ष्म जीवही आढळला, तर त्याला आम्ही ‘परग्रह जीवन’ या रूपातच वर्गीकृत करू. जीवसृष्टीच्या उत्पत्तीला पोषक स्थिती बह्मांडातील केवळ पृथ्वी नामक ग्रहावरच आहे, अन्यत्र नाही असे म्हणणे अत्यंत धाडसाचेच आहे. मात्र, मानवासारख्या प्रगत जीवांच्या रूपातही अन्यत्र जीवसृष्टी असेल, असे गृहीत धरूनही संशोधन सुरूच आहे. असे प्रगत जीव असलेच, तर तेही वेगळ्या नियमांनी बांधले गेलेले असू शकतात.

  जोंटी हॉर्नर : दक्षिण क्‍वीन्सलँड विद्यापीठातील खगोलशास्त्राचे प्राध्यापक जोंटी हॉर्नर यांनी सांगितले की, अंतराळाचा पसारा अतिशय मोठा आहे. बह्मांडात अगणित तारे आहेत आणि जवळजवळ प्रत्येक तार्‍याभोवती फिरणारे ग्रह आहेत. आपल्या ‘मिल्की वे’ या आकाशगंगेतच ४००अब्ज तारे असण्याचे अनुमान आहे. आकाशगंगेत जितके ग्रह आहेत, त्यापेक्षा अधिक संपूर्ण बह्मांडात आकाशगंगा आहेत. त्यामुळे एलियन्स आहेत असे मानले, तरी त्यांचे पुरावे शोधणे हे अत्यंत कठीण काम आहे. मात्र एलियन्स आहेत की नाहीत? या प्रश्‍नाचे उत्तर निश्‍चितपणे ‘आहेत’ असेच असावे. मात्र, खरा प्रश्‍न हा आहे की, आपण शोधण्याइतके एलियन्स आपल्या इतक्या नजीक आहेत का?

  लेन मेनाई-केसली : ऑस्ट्रेलियातील वरिष्ठ उपकरण वैज्ञानिक लेन मेनाई-केसली यांनी म्हटले आहे की, आपण कुठे ना कुठे सक्रिय जीवन शोधू शकू, असा मला विश्‍वास वाटतो. काही कालावधीनंतर त्यामध्येही आपल्याला यश मिळू शकेल. आपल्याच सौरमंडळातही संशोधक त्याद‍ृष्टीने अनुकूल व संभाव्य ठिकाण शोधत आहेत. गुरूचे दोन मोठे चंद्र गॅनीमीड आणि युरोपा यांच्यावर बर्फाच्या स्तराखाली महासागर आहेत. हे असे चंद्र आहेत जेथील तापमान योग्य आहे आणि तिथे पाणी व खनिजेही आहेत. आपण जीवसृष्टीचा विचार नेहमी पृथ्वीसापेक्षच करीत असतो. मात्र, परिस्थितीनुसार अन्य खगोलांवरील जीवसृष्टी पृथ्वीवरील जीवनापेक्षा वेगळी असू शकते. शनिचा चंद्र टायटनवरही अणूंची एक रंजक शृंखला आहे. तसेच तिथे विशिष्ट ऋतुचक्रही आहे. आपल्याच सौरमंडळात असे वैविध्य आहे, तर आकाशगंगेत असे अनेक सौरमंडळ आणि बह्मांडात अशा अनेक आकाशगंगा आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे सक्रिय जीवसृष्टी असण्याची शक्यता मोठीच आहे!

  रिबेका एलन : स्विनबर्न विद्यापीठातील खगोल संशोधिका रिबेका एलन यांनी सांगितले की, आपल्या आकाशगंगेतच शंभर अब्जांपेक्षा अधिक ग्रह असून, सुमारे सहा अब्ज ग्रहांकडे ते पृथ्वीसद‍ृश असावेत म्हणून पाहिले जाते. त्यामुळे पृथ्वीशिवाय अन्यत्रही जीवसृष्टी असणे शक्य आहे; पण अद्याप त्याची पुष्टी झालेली नाही इतकेच! अर्थात, आपण ‘एलियन’ म्हणतो त्यावेळी आपल्या डोळ्यांसमोर मानवासारखीच आकृती उभी राहते. मात्र, पृथ्वीवरही जीवनाचे सर्वात प्रमुख रूप अतिशय पुरातन, छोटे आणि अधिक लवचिक आहे. हे वर्णन अर्थातच सूक्ष्म जीवांबाबत आहे. ज्या ठिकाणी जीवनाची कोणतीही आशा नसते अशा ठिकाणीही सूक्ष्म जीव असतात. त्यामुळे अन्य ग्रहांवरील खडतर स्थितीतही सूक्ष्म जीवांच्या रूपातील ‘एलियन’ असू शकतात.

  मार्टिन व्हॅन-क्रॅनेंडोंक : यूएनएसडब्ल्यू’चे प्राध्यापक मार्टिन व्हॅन-क्रॅनेंडोंक यांनी सांगितले की, एलियन्सचे अस्तित्व आहे की नाही, या प्रश्‍नाचे सरळ उत्तर ‘नाही’ असेच आहे. जर आपण अनुभवजन्य माहितीचा उपयोग करून पृथ्वीबाहेरील जीवनाशी संदर्भातील प्रश्‍नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, तर ‘नाही’ असेच उत्तर येते. अर्थातच या प्रश्‍नाशी संबंधित आपले ज्ञानही मर्यादितच आहे. आपण जीवनाच्या संकेतांबाबत बह्मांडाच्या प्रत्येक कानाकोपर्‍याची तपासणी केलेली नाही. तसेच एखाद्या अन्य रासायनिक प्रणालीत जीवन असू शकते का, हेही आपल्याला माहिती नाही. याचे कारण इथे पृथ्वीवरही कार्बन आधारित जीवनाची कोणतीही सर्वसंमत व्याख्या नाही. त्यामुळे अधिक विस्तारित उत्तर ‘आपल्याला माहिती नाही’ असेच असू शकते. वास्तवात, या प्रश्‍नाचे उत्तर देण्यासाठी आपण सक्षम नाही. मात्र, सध्या निश्‍चितपणे या विषयावर बरेच संशोधन होत आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याला नक्‍कीच समजेल की आपण बह्मांडात एकटेच आहोत की आपल्याला आणखी कुणी शेजारी आहेत