world environment day

दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवस (World Environment Day)साजरा करण्यासाठी एक विशेष थीम तयार करण्यात येते. या वर्षी 'Reimagine, Recreate, Restore' ही थीम आहे. त्या माध्यमातून पर्यावरणातील लहान लहान गोष्टींचे संवर्धन करणे, त्याचा शाश्वत पद्धतीने वापर करणे हा संदेश देण्यात येत आहे.

  आज ५ जून. आजच्या दिवशी जगभरात जागतिक पर्यावरण दिन(World Environment Day 2021) साजरा करण्यात येतो. हा दिवस म्हणजे सत्तरच्या दशकात सुरु झालेली संयुक्त राष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी जागरुकता मोहीम आहे. वसुंधरेची चिंता असलेले, त्याची काळजी घेणारे अनेक पर्यावरणवादी घटक, संघटना, पर्यावरण प्रेमींकडून आजचा दिवस हा उत्साहाने साजरा केला जातो.

  आज जगासमोर हवामान बदलाचं संकट आहे.  जागतिक तापमानात वाढ होत आहे. प्रदुषणाची समस्या वाढत आहे. अनेक ठिकाणची जंगले विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त केली जातात.

  पृथ्वीवर आणि समुद्रातही प्लॅस्टिकचे साम्राज्य वाढलं आहे. त्यामुळे पृथ्वीवरील सर्व सजिवांचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यामागे या पृथ्वीची काळजी आणि तिला वाचवण्याची तळमळ आहे.

  पर्यावरण दिनाचा इतिहास 

  औद्योगिक क्रांतीनंतर वातावरणातील कार्बनचे प्रमाण वाढू लागले. कार्बनचे अगदी अल्प प्रमाणही वाढलं तर त्याचा मोठा परिणाम पृथ्वीवरील सर्व सजिवांवर होत आहे. त्यामुळे यावर काहीतरी उपाय शोधण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या वतीनं प्रयत्न सुरु झाले. त्याचाच परिणाम म्हणजे १९७२ साली स्टॉकहोम येथे जागतिक वसुंधरा परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत जगभरातील ११९ देश सामिल झाले होते. भारतानेही या परिषदेत भाग घेतला आणि मोठं योगदान दिलं. या परिषदेत दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी एक म्हणजे पर्यावरणावर काम करणाऱ्या यूएनईपी म्हणजे युनायटेड नेशन्स एनव्हायरमेन्ट प्रोग्राम या संस्थेची स्थापना आणि दुसरं म्हणजे दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस साजरा करायचा. तेव्हापासून जागतिक पर्यावरण दिन साजरा होऊ लागला.

  यावर्षीची थीम काय ?

  दरवर्षी पर्यावरण दिवस साजरा करण्यासाठी एक विशेष थीम तयार करण्यात येते. या वर्षी ‘Reimagine, Recreate, Restore’ ही थीम आहे. त्या माध्यमातून पर्यावरणातील लहान लहान गोष्टींचे संवर्धन करणे, त्याचा शाश्वत पद्धतीने वापर करणे हा संदेश देण्यात येत आहे. पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या वेगवेगळ्या संघटनांनी हे दशक ‘Decade of Restoring Ecosystems’ म्हणजेच परिसंस्था पुनर्संचयनाचं दशक म्हणून साजरं करण्याचा निर्णय घेतलाय. जागतिक तापमान वाढ जर २ अंश सेल्सियसपेक्षा कमी ठेवायचं असेल आणि वाढत्या लोकसंख्येची अन्नसुरक्षा साधायची असेल तर या परिसंस्थांचं पुनुरुज्जीवन करणं अत्यंत आवश्यक असल्याचं यूएनने आपल्या एका अहवालात सांगितलं आहे.