Antartica iceberg melt

अंटार्क्टिकामध्ये (Antarctica) बर्फाचा एक भला मोठा हिमनग (Iceberg) तुटून पडू लागला आहे. हा जगातील सर्वात मोठा हिमनग मानला जातो.

    लंडन : जगभरातील पर्यावरणप्रेमी,अभ्यासक आणि वैज्ञानिक यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे. अंटार्क्टिकामध्ये (Antarctica) बर्फाचा एक भला मोठा हिमनग (Iceberg) तुटून पडू लागला आहे. हा जगातील सर्वात मोठा हिमनग मानला जातो. हा हिमनग १७० किलोमीटर लांब आणि सुमारे २५ किलोमीटर रुंद आहे.

    अंटार्क्टिकामधील पश्चिम भागातील रोन्ने आईस सेल्फमध्ये असणारा हा महाकाय हिमनग तुटताना युरोपीय स्पेस एजन्सीच्या  उपग्रहाच्या छायाचित्रांमध्ये दिसून आला आहे. हा हिमनग तुटल्याने जगभरात चिंता पसरली आहे.

    हा हिमनग तुटल्यानंतर तो वेड्डेल समुद्रात स्वतंत्रपणे तरंगत आहे. या महाकाय हिमनगाचा पूर्ण आकार ४३२० किलोमीटर आहे. हा जगातील सर्वात मोठा हिमनग मानला जात असून त्याला ए-७६ असं नाव देण्यात आलं आहे. हा हिमनग तुटल्याची छायाचित्रे युरोपियन युनियनच्या कोपरनिकस सेंटीनल या उपग्रहाने (Satellite) काढलेली आहेत. हा उपग्रह जमिनीवरील धुव्रीय प्रदेशांवर लक्ष ठेवतो. ब्रिटनच्या अंटार्क्टिक सर्व्हे दलाने सर्वप्रथम हा हिमनग तुटून पडल्याचे जाहीर केले होते.

    हा हिमनग तुटल्याने किंवा स्खलन झाल्याने थेट समुद्रातील पाणीपातळी वाढणार नाही. परंतु,अप्रत्यक्षपणे पाणीपातळीत नक्की वाढ होऊ शकते. तसेच यामुळे हिमनगांचा वेग आणि बर्फाचा प्रवाह कमी होऊ शकतो. अंटार्क्टिकातील भूभाग हा पृथ्वीवरील अन्य भुभागांच्या तुलनेत वेगाने तप्त होत असल्याचा इशारा या सेंटरनं दिला आहे. अंटार्क्टिकामध्ये बर्फाच्या स्वरुपात इतके पाणी साठलेले आहे की हा बर्फ जर वितळला तर जगभरातील समुद्रामधील पाणीपातळी (Water Level) २०० फुटांपर्यंत वाढू शकते.

    वैज्ञानिकांच्या मते, ए-७६ हा हिमनग हा हवामान बदलामुळे नाही तर नैसर्गिक कारणांमुळे तुटला आहे. ए-७६ आणि ए-७४ हे दोन्ही हिमनग त्यांचा कालावधी संपल्यानं नैसर्गिक कारणांमुळे तुटले आहेत,असे ट्वीट ब्रिटीश अंटार्क्टिक सर्व्हे ग्रुपच्या वैज्ञानिक लॉरा गेरीश यांनी केले आहे.