चीनमधील विद्यार्थी घेणार शी जिनपिंग यांच्याविषयीचे धडे,  समाजवाद रुजण्यासाठी अभ्यासक्रमात करण्यात आला बदल

चीनमध्ये आता प्राथमिक शालेय शिक्षणापासून महाविद्यालय शिक्षणात राष्ट्रपती शी जिनपिंग(Xi Jinping Lessons In Chinese Education) यांचे धडे शिकवले जाणार आहेत.

    चीनने(China) एक मोठा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये आता प्राथमिक शालेय शिक्षणापासून महाविद्यालय शिक्षणात राष्ट्रपती शी जिनपिंग(Xi Jinping Lessons In Chinese Education) यांचे धडे शिकवले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, समाजवादाविषयीचे जिनपिंग यांचे विचार चीनच्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिकणं अनिवार्य असणार आहे. शी जिनपिंग यांचे विचार पाठ्यपुस्तकातून शिकवल्यास विद्यार्थ्यांना मार्क्सवादी विचारसरणी समजण्यास मदत होईल, असे चीनच्या शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. या अभ्यासक्रमाविषयी सूचना जारी करण्यात आली आहे.

    चीनच्या शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं की, “विद्यार्थ्यांना चीनच्या वैशिष्ट्यांसोबत समाजवादी विचार शिकवले जातील. यासाठी राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे विचार पाठ्यपुस्तकात समाविष्ट केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि पक्षाचा संकल्प पूर्ण करण्यास मदत होणार आहे”.

    शी जिनपिंग २०१२ सालापासून चीनचे राष्ट्रपती आहेत. जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या ध्येय धोरणांचा विस्तार करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. शी जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक माओ यांच्यासारखी आपली प्रतिमा निर्माण केली आहे.  चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाने आपल्या स्थापनेचा शताब्दी सोहळा नुकताच साजरा केला.