अमेरिकेत गोळीबाराच सत्र थांबेना; वॉलमार्ट स्टोअरमध्ये गोळीबारात 10 जणांचा मृत्यू, हल्लेखोर ठार

संबंधित मार्टचा व्यवस्थापकाने ब्रेक रूममध्ये जात अचानक उपस्थित कर्मचाऱ्यांवर अंधाधूंद गोळीबार करण्यास सुरूवात केल्याची माहिती समोर आली आहे.

    अमेरिका : अमेरिकेत गोळीबाराच्या घटना काही केल्या थांबताना दिसून येत नाही आहे. वारंवांर येथे गोळीबाराच्या घटना घडत असतात. आता र्जिनियातील चेसापीक येथील वॉलमार्ट स्टोअरमध्ये अज्ञाताने गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. तर गोळीबार करणारा हल्लोखोरही ठार झाल्याची माहिती आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  र्जिनियातील चेसापीक येथील वॉलमार्ट स्टोअरमध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही गोळाबाराची घटना घ़डली. अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार मंगळवारी रात्री 10:12 मिनिटांनी गोळीबार झाल्याचा फोन पोलिसांना आला होता. या हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या चकमकीत हल्लेखोर ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तर,  सुरक्षेच्या कारणास्तव घटनास्थळावरील  इमारतीपासून लांब राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

    डेलीमेल डॉट कॉमवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, घटनास्थळी उपस्थित लोकांनी गोळीबार करणारा व्यक्ती स्टोअरचा व्यवस्थापक असल्याची माहिती आहे. संबंधित मार्टचा व्यवस्थापकाने ब्रेक रूममध्ये जात अचानक उपस्थित कर्मचाऱ्यांवर अंधाधूंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. दोन दिवसांपूर्वी, कोलोरॅडो स्प्रिंग्समध्ये एका  क्लबमध्ये एका बंदुकधारीने गोळीबार केल्याची घटना घडली होती. ज्यात किमान पाच लोक ठार आणि 18 जखमी झाले होते.