इराकमध्ये भर मांडवाची झाली स्मशानभूमी! लग्नसमारंभात भीषण आग, वधू-वरांसह जवळपास 100 जणांचा मृत्यू

उत्तर इराकमध्ये एका लग्नमंडपात लागलेल्या आगीत 100 जणांचा मृत्यू झाला असून 150 जण जखमी झाले आहेत.

    लग्न समारंभ म्हण्टलं की लोकांच्या उत्साहाला उधाण आलेलं असतं. लग्न समारंभ सगळ्यात चांगला व्हावा यासाठी लोकं पाण्यासारखा पैसा उधळतात. मात्र, उत्साहाच्या भरात अशा ठिकाणी अनेकदा दुर्घटना झाल्याच समोर येतं. अशीच एक घटना इराकमध्ये उघडकीस आली आहे.  उत्तर इराकमधील निनेवेह प्रांतातील अल-हमदानिया जिल्ह्यात मंगळवारी (26 सप्टेंबर) एका लग्नाला (Iraq Marriage Fire) लागलेल्या आगीत किमान 100 लोकांचा मृत्यू झाला असून 150 जण जखमी झाले. दुर्देवाने यामध्ये वधू वराचाही समावेश आहे.

    नेमका प्रकार काय?

    मात्र आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसून फटाके पेटवल्याने आग लागल्याचे प्राथमिक वृत्त आहे. त्याचबरोबर विवाह हॉलचा बाहेरील भाग अत्यंत ज्वलनशील आवरणाने सजवला होता जो देशात बेकायदेशीर होता. व्हिडीओ फुटेजमध्ये लग्नमंडपात ज्वाळा उठताना दिसत आहेत. आग लागल्यानंतर लोक घटनास्थळावरून जात असताना केवळ ढिगारा दिसत होता. या घटनेत जीव वाचवलेल्या लोकांनी ऑक्सिजनसाठी स्थानिक रुग्णालय गाठले. इराकी न्यूज एजन्सी नीनाने पोस्ट केलेल्या एका छायाचित्रात अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे काम करत आहेत. याशिवाय सोशल मीडियावर स्थानिक पत्रकारांच्या छायाचित्रांमध्ये कार्यक्रम हॉलचे जळलेले अवशेष दिसत आहेत.
    आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते सैफ अल-बद्र म्हणाले, “दुर्दैवी अपघातामुळे बाधित झालेल्यांना मदत देण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत.” पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांनी आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, असे त्यांच्या कार्यालयाने ऑनलाइन निवेदनात म्हटले आहे.
    इराकमध्ये ख्रिश्चनांची संख्या सुमारे 150,000 आहे. 2003 मध्ये ही संख्या सुमारे 15 लाख होती. इराकची एकूण लोकसंख्या ४ कोटींहून अधिक आहे.