चीन विमान अपघातात 132 प्रवाशांचे मृतदेह सापडले, मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु

तपास पथकाचे ऑपरेशन जवळपास पूर्ण झाले आहे. तपासकर्त्यांनी डीएनए चाचणीद्वारे 120 मृतांची ओळख पटवली आहे. तपास पथकाला विमानाचे दोन्ही ब्लॅक बॉक्स सापडले आहेत.

    चिनच्या ग्वांगझूजवळ अपघात झालेल्या चायना इस्टर्न 737-800 विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. चिनी अधिकाऱ्यांनी शनिवारी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. चीनच्या नागरी उड्डयन प्रशासनाचे उपसंचालक हू झेनजियांग यांनी सांगितले की, विमानातील सर्वांचा मृत्यू झाला आहे. प्रवाशांचे मृतदेह सापडले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

    बऱ्याच प्रयत्नांनंतर सापडले दोन्ही ब्लॅक बॉक्स
    चीनच्या सरकारी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हू झेजियांग यांनी सांगितले की, तपास पथकाचे ऑपरेशन जवळपास पूर्ण झाले आहे. तपासकर्त्यांनी डीएनए चाचणीद्वारे 120 मृतांची ओळख पटवली आहे. तपास पथकाला विमानाचे दोन्ही ब्लॅक बॉक्स सापडले आहेत. पहिला ब्लॅक बॉक्स तीन दिवसांच्या प्रयत्नानंतर सापडला, तर दुसरा ब्लॅक बॉक्स अपघाताच्या चौथ्या दिवशी सापडला.