सौदी अरेबियात मोठा अपघात! प्रवाशांनी भरलेली बस पुलाला धडकली, त्यांनतर लागलेल्या आगीत 20 जणांचा मृत्यू

येमेनच्या सीमेला लागून असलेल्या नैऋत्य असीर प्रांतात वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. बसमधील प्रवासी उमराह करण्यासाठी मक्का शहरात जात होते

सौदी अरेबियामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. (Saudi Bus Accident) सौदी अरेबियाच्या नैऋत्य भागात सोमवारी प्रवाशांनी भरलेल्या बसला अपघात होऊन 20 जणांचा मृत्यू झाला असुन 29 लोक जखमी झाले आहेत. सौदी अरेबियाच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी बहुतेक यात्रेकरू होते. जे रमजानच्या पवित्र महिन्यात उमराह (इस्लाममधील तीर्थयात्रेचा एक प्रकार) करण्यासाठी मक्का शहरात जात होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भरधाव वेगात असलेली बस आधी पुलावर आदळली त्यानंतर बसला  आग लागली. या घटनेचे फुटेज समोर आले असून, त्यात बस पूर्णपणे जळालेली दिसत आहे. येमेनच्या सीमेला लागून असलेल्या नैऋत्य असीर प्रांतात वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना रमजानच्या पहिल्या आठवड्यात घडली. रमजानच्या पवित्र महिन्यातच ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.