mexico accident

मॅक्सिकोमध्ये प्रवाशांनी भरलेली बस दरीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला असून 21 जण गंभीर जखमी झाले आहेत.

    मॅक्सिको: मॅक्सिकोमध्ये बसला भीषण अपघात (Mexico Bus Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. ओक्साका राज्यात ही घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली बस दरीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला असून 21 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामध्ये या बसचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. अपघाताचा तपास मॅक्सिको पोलिसांकडून (Mexico Police) सुरु आहे.

    चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने अपघात
    मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मॅग्डालेना पेनास्को शहरात सकाळी 6.30 च्या सुमारास बसला अपघात झाला. डोंगराळ भागातून बस जात होती. अचानक चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस दरीत कोसळून हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. प्रवाशांनी भरलेली बस बुधवारी मॅक्सिको सिटीहून योसुंडुआला जात होती. या बसमधून 40 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला आणि 21 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

    बसचा चक्काचूर
    मॅक्सिको पोलिसांनी या अपघाताबाबत माहिती दिली. या अपघातात बसचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ओक्साकाच्या गव्हर्नरने ट्वीट करून अपघाताची माहिती दिली. त्लाक्सियाओ सिव्हिल प्रोटेक्शन कर्मचाऱ्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. मृतांमध्ये एक वर्षाचं बाळ, 13 महिला आणि 13 पुरुषांचा समावेश आहे.

    या अपघातामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला असावा, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की, स्थानिक वाहतूक कंपनीची ही बस 4 जुलैला रात्री राजधानी मेक्सिको सिटी येथून निघाली होती. सॅंटियागो डी योसुंडुआ शहराकडे जात होती. राज्य अधिकारी जीसस रोमेरो यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, चालकाचं वाहनावरील नियंत्रण अचानक सुटलं आणि बसला अपघात झाला आहे. ही बस 80 फूटांपेक्षा जास्त खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळाली आहे.