मेक्सिकोत नौदलाचे हेलिकॉप्टर कोसळले, १४ ठार; ड्रग्ज माफियावर कारवाई

मेक्सिकोमध्ये नौदलाचे ब्लॅकहॉक हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. हे हेलिकॉप्टर उत्तरेकडील राज्य सिनालोआ येथे कोसळले. सिनालोतील ड्रग्ज माफिया राफेल कारो क्विंटेरो याच्या अटकेमुळेच हा घातपात घडवल्याचे काही धागेदोरे मिळाल्याचे नौदलाने सांगितले.

    नवी दिल्ली : मेक्सिकोमध्ये नौदलाचे (Mexico Navy) ब्लॅकहॉक हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर (BlackHawk Helicopter) कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. हे हेलिकॉप्टर उत्तरेकडील राज्य सिनालोआ येथे कोसळले. मात्र, यामागे घातपात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिनालोतील ड्रग्ज माफिया राफेल कारो क्विंटेरो (Drug Smuggler Rafael Caro Quintero Arrest) याच्या अटकेमुळेच हा घातपात घडवल्याचे काही धागेदोरे मिळाल्याचे नौदलाने सांगितले.

    मेक्सिकोच्या नौदलाने शुक्रवारी राफेल क्वांटेरो या ड्रग्ज माफियाला अटक केली होती. राफेलने १९८५ मध्ये अमेरिकेच्या अॅन्टी नार्कोटिक्स एजंटचा (Anti Narcotics Agent Murder) छळ करुन हत्या केली होती. याचप्रकरणी त्याला मेक्सिकन पोलिसांनी अटक केली होती. राफेल कारो क्विंटेरोला मेक्सिकोच्या ड्रग्ज तस्करीचे केंद्र असलेल्या सिनालोआ (Sinaloa) राज्यातील चोईक्स नगरपालिकेच्या हद्दीत पकडले. ही अटक अमेरिकेच्या (USA) दबावानंतर झाली होती; तसेच याच आठवड्यात मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर (Andres Manuel Lopez Obrador) यांनी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांची भेट घेतली होती.