जिन्नांच्या स्वप्नातल्या देशाचं 76 वर्षात मोडलं कंबरडं, कंगालीच्या अवस्थेत साजरा होतोय पाकिस्तान दिवस

संपूर्ण जगात पाकिस्तान असा एकमेव देश आहे ज्याला आयएमएफने 23 वेळा आर्थिक मदत केली आहे. गंभीर आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानला आता पुन्हा आर्थिक मदत मिळाली नाही तर देश कंगाल म्हणून घोषित होऊ शकतो.

इस्लामाबाद : आज पाकिस्तान दिवस (Pakistan Day) आहे. आजच्याच दिवशी ब्रिटिशांच्या काळात भारतात मुसलमानांसाठी वेगळ्या देशाची निर्मिती करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. अखिल भारतीय मुस्लीम लीगच्या लाहोरमधील 1940 या वर्षी 22 ते 24 मार्च दरम्यान झालेल्या सत्राला आज 83 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यादिवशी कायद-ए- आजम मोहम्मद अली जिन्ना(Mohammed Ali Jinnah) यांनी सांगितलं होतं की, हिंदू आणि मुस्लिम (Muslim Country) या दोन संस्कृती परस्पर विरोधी विचारांवर आधारित आहेत. जिन्नांच्या द्विराष्ट्र सिद्धांताचा हा सगळ्यात मोठा तर्क होता.

जिन्नांच्या या तर्कावरच पाकिस्तान देशाची पायाभरणी करण्यात आली. मात्र जिन्ना यांना याची कल्पना नव्हती की त्यांच्या स्वप्नातला देश कधी हुकूमशाह आणि भ्रष्ट राजकारण्यांच्या हातात जाऊन उद्ध्वस्त होईल. आज पाकिस्तानची आर्थिक स्थिती इतकी खराब आहे की, इच्छा असतानाही ते पाकिस्तान दिवसानिमित्त कोणता कार्यक्रम आयोजित करू शकत नाहीत.

आर्थिक संकटात पाकिस्तान
एक स्वतंत्र राष्ट्राच्या रुपात सुरुवातीला पाकिस्तानला परदेशातून खूप मदत मिळाली. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानला जणू काही अमेरिका आणि ब्रिटनने दत्तकचं घेतलं होतं. पाकिस्तानी जनतेला याचा खूप फायदा झाला. कारण या दोन्ही देशांमधून निधी आणि हत्यारं दोन्हीचा पुरवठा करण्यात आला. या हत्यारांच्या आणि पैशांच्या जोरावर पाकिस्तानने अनेकदा भारतावर आक्रमण केलं. मात्र प्रत्येक वेळी ते तोंडावर आपटले. स्वातंत्र्याच्या दोन दशकांनंतर पाकिस्तानची अवस्था खराब व्हायला सुरुवात झाली.ज्या देशांनी त्यांच्यावर सत्ता गाजवली त्या देशांसमोर पाकिस्तानने शरणागती पत्करली.

पाकिस्तानी लोकही मानतात की, त्यांचा देश कायदे आजमनी पाहिलेली स्वप्नं पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. पाकिस्तान ना आर्थिकदृष्ट्या परिपक्व झाला ना राजकीयदृष्ट्या सुधारू शकला. उरलेली कसर पाकिस्तानच्या सैन्याने भरून काढली. पाकिस्तानी सैन्याच्या परवानगीशिवाय कुणीही देशाचा पंतप्रधान किंवा राष्ट्रपती बनू शकत नाही. सैन्य आपल्या मर्जीनुसार केव्हाही आणि कुणालाही देशाची सत्ता बहाल करू शकतं आणि वाटेल तेव्हा त्यांना खालीही उतरवू शकतं. लियाकत अली खानपासून शहबाज शरीफपर्यंत सगळे राजकीय नेते पाकिस्तानच्या सैन्याच्या आशिर्वादाने पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची खुर्ची मिळवू शकले आहेत. बेनजीर भूट्टो यांच्या हत्येचा आरोपही पाकिस्तानी सैन्यावर लावण्यात आला होता. त्यांच्यावरील हल्ल्याच्या आधी त्यांची सुरक्षा अचानक हटवण्यात आली होती. नवाज शरीफ, इम्रान खान यांच्या बाबतीत सैन्याने काय केलं हे सगळ्यांनी पाहिलं आहे.

आयएमएफकडून 23 वेळा आर्थिक मदत
संपूर्ण जगात पाकिस्तान असा एकमेव देश आहे ज्याला आयएमएफने 23 वेळा आर्थिक मदत केली आहे. गंभीर आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानला आता पुन्हा आर्थिक मदत मिळाली नाही तर देश कंगाल म्हणून घोषित होऊ शकतो. आधीच महागाईने पिचलेल्या पाकिस्तानच्या नागरिकांना देश कंगाल झाल्यावर येणारा आर्थिक भार परवडणारा नाही. दहशतवाद्यांच्या संघटनाही पाकिस्तान गिळंकृत करण्याच्या प्रयत्नात आहेत. तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने तर युद्धाची घोषणा केली आहे. त्यामुळे पाकिस्तानवर संकटांवर संकटं येत आहेत, असंच म्हणावं लागेल.