अमेरिकेपाठोपाठ जपानमध्येही हिमवादळाचा कहर! 17 जणांचा मृत्यू, शेकडो लोक वाहनांमध्ये अडकले

यापैकी बरेच लोक छतावरून बर्फ साफ करताना पडले तसेच छतावरून पडणाऱ्या बर्फाच्या मोठ्या तुकड्यांखाली गाडले गेले.

    टोकियो : गेल्या काही दिवसापासून अमेरिकेत (America) हिमवादळाचा कहर केला असून या हिमवादळाच्या कहरामुळे आतापर्यंत ३४ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर,  देशातील बहुतांश राज्यामध्ये धोकादायक बर्फवृष्टी होत आहे. आता जपानमध्ये हिमवादळ आलं असून प्रचंड हिमवृष्टीमुळे 17 जणांचा मृत्यू झाला, तर 90 हून अधिक लोक जखमी झाले. अनेक ठिकाणी वीजपुरवठा ठप्प झाला आहे.

    आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जपानमध्ये गेल्या आठवड्यापासून उत्तरेकडील भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे, शेकडो वाहने महामार्गांवर अडकून पडली आहेत, विज पुरवठा खंडीत झाला आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, शनिवारपर्यंत वेगवेगळ्या घटनांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. ख्रिसमसच्या शनिवार व रविवारच्या अधिक बर्फवृष्टीमुळे सोमवारी सकाळपर्यंत मृतांची संख्या 17 आणि जखमींची संख्या 93 वर पोहोचली. यापैकी बरेच लोक छतावरून बर्फ साफ करताना पडले तसेच छतावरून पडणाऱ्या बर्फाच्या मोठ्या तुकड्यांखाली गाडले गेले. त्यामुळे बर्फवृष्टीग्रस्त भागातील लोकांना बर्फ साफ करताना सावधगिरी बाळगण्याचे आणि एकटे काम न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

    अमेरिकेत हिमवादळाचा कहर सुरूच आहे. आतापर्यंत मिळालेल्या वृत्तानुसार जवळपास या हिमवादळामुळे जवळपास  40 जणांचा मृत्यू झाला आहे. लाखो लोक घरात अडकले आहेत. सुमारे 7.5 कोटी घरांची वीज खंडित झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बर्फवृष्टी होत आहे. बचाव पथक पूर्णपणे काम करू शकत नाही. आता जपानलाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.