vladimir putin and xi jinping

वॉल स्ट्रीट जर्नलने शी जिनपिंग यांच्या योजनांविषयी माहिती देताना सांगितलं की, पुतिन यांच्यासोबतची त्यांची बैठक म्हणजे बहुदलीय शांती चर्चेचा एक भाग असेल. कारण रशिया आणि युक्रेनमधला संघर्ष संपवण्यासाठी चीनला महत्त्वाची भूमिका पार पाडण्याची इच्छा आहे.

मॉस्को: अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन (Joe Biden) यांनी अचानक केलेल्या युक्रेन दौऱ्यानंतर आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी असे संकेत दिले आहेत की चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping To Visit Moscow) आगामी काळात रशियातील मॉस्को येथे येतील. क्रेमलिनमध्ये चीनचे वरीष्ठ राजकीय नेता वांग यी यांचं स्वागत करताना त्यांनी सांगितलं की,“जिनपिंग यांच्या दौऱ्याची आम्ही वाट बघत आहोत. यासंदर्भात दोन्ही देशांमध्ये बोलणी झाली आहेत.” पुतिन म्हणाले की, “सगळ्या गोष्टी प्रगतीपथावर आहेत. विकासासाठी हालचाली होतील. आम्ही चर्चेचा पुढचा टप्पा गाठला आहे. ” रशिया- युक्रेन युद्धाला 24 फेब्रुवारीला एक वर्ष पूर्ण होत असतानाच पुतिन यांनी जिनपिंग यांच्या दौऱ्याविषयी भाष्य केलं आहे.

मार्च किंवा एप्रिलमध्ये शी जिनपिंग यांचा रशिया दौरा
वॉल स्ट्रीट जर्नलने शी जिनपिंग यांच्या योजनांविषयी माहिती देताना सांगितलं की, पुतिन यांच्यासोबतची त्यांची बैठक म्हणजे बहुदलीय शांती चर्चेचा एक भाग असेल. कारण रशिया आणि युक्रेनमधला संघर्ष संपवण्यासाठी चीनला महत्त्वाची भूमिका पार पाडण्याची इच्छा आहे. रिपोर्टनुसार, याशिवाय चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यासाठीची तयारी अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. संपूर्ण तयारी झालेली नाही. शी जिनपिंग हे मार्च किंवा एप्रिलमध्ये रशियाचा दौरा करण्याची शक्यता आहे. याच काळात दुसऱ्या महायुद्धात जर्मनीला हरवल्याचं सेलिब्रेशनही सुरु असेल.

शी जिनपिंग यांच्या रशिया दौऱ्यामुळे वाढली अमेरिकेची चिंता
शी जिनपिंग यांच्या संभाव्य रशिया दौऱ्यामुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने बुधवारी सांगितलं की, चीन आणि रशियाच्या वाटाघाटीमुळे आम्हाला काळजी वाटते. याआधी वॉशिंग्टन यांनी सांगितलं होतं की, चीन युक्रेनमध्ये रशियाच्या युद्धासाठी हत्यारे पुर‌वण्यावर विचार करत आहे. हा संघर्ष एकिकडे रशिया आणि चीन, दुसरीकडे युक्रेन आणि अमेरिका यांच्या नेतृत्वातील नाटो सैन्य एकीकरणामधील नात्यावर परिणाम करेल.

चीनचे वांग यी मंगळवारी मॉस्कोमध्ये आले. असं सांगितलं जातं की या त्यांच्या दौऱ्यामध्ये चीन- रशिया संबंध आणि हितकारक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होईल. वांग यी यांनी रशियन सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाई पत्रुशेव यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. ते बुधवारी पुतिन यांनाही भेटले. आता या सगळ्या भेटीगाठींचा रशिया -युक्रेन युद्धावर काय परिणाम होईल ? हे पाहावे लागेल.