pakistan

महागाईच्या राक्षसासोबतच सध्या पाकिस्तानातील (Pakistan) बेरोजगारीनंही कळस गाठलेला आहे. दररोज हजारो पाकिस्तानी त्यांच्या नोकऱ्या गमावताना दिसतायेत. यंदाच्या 2023 या वर्षभरात लाखो जणांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

  इस्लामाबाद: श्रीलंकेप्रमाणेच (Sri Lanka) पाकिस्तानातही (Pakistan) येत्या काही नागरिकांचा असंतोष रस्त्यावर दिसू शकतो. सत्तापालट घडू शकतो, असे संकेत मिळू लागले आहेत. पाकिस्तानच्या आर्थिक संकटाच्या (Pakistan Economic Crisis) स्थितीत सर्वाधिक जास्त झळ बसते आहे ती सामान्य पाकिस्तानी नागरिकांना. महागाईनं उच्चांक गाठला असल्यानं सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांचं जगणं नरकासारखं झालेलं आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याच्या किमती आवाक्याबाहेर पोहचलेल्या आहेत. अन्नधान्याची सवलतीच्या दरात खरेदी करण्यासाठी हाणामाऱ्या आणि चेंगराचेंगरीच्या घटना घडतायेत.

  लाखो पाकिस्तानी नागरिक नोकऱ्यांना मुकणार
  महागाईच्या राक्षसासोबतच सध्या पाकिस्तानातील बेरोजगारीनंही कळस गाठलेला आहे. दररोज हजारो पाकिस्तानी त्यांच्या नोकऱ्या गमावताना दिसतायेत. यंदाच्या 2023 या वर्षभरात लाखो जणांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 2023 साली पाकिस्तानातील बेरोजगारांची संख्या 62.5 लाख राहण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातील कार्यकुशल मनुष्यबळापैकी ही संख्या 8.5 टक्के इतकी मोठी आहे.

  पाकिस्तानात गुन्हेगारी वाढण्याची भीती
  बेरोजगारांची संख्या वाढली तर पाकिस्तानात गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था वा इतर कुठल्यातरी देशाकडून आर्थिक मदतीच्या विवंचनेत सध्या पाकिस्तानी सरकार आहे. पाकिस्तानचे खास मित्र असलेली राष्ट्रेही मदतीसाठी पुढे येताना दिसत नाहीत. अशा स्थितीत शहबाज सरकार मिनी बजेट सादर करणार आहे. हे बजेट आल्यानंतर बेरोजगारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सरकार सध्याची स्थिती सावरण्यासाठी कठोर आर्थिक उपाययोजना करेल, त्याचा थेट फटका रोजगारांना बसण्याची शक्यता आहे.

  65 लाख बेरोजगार तरुणांचं करायचं काय ?
  सध्या पाकिस्तानची लोकसंख्या 25 कोटी आहे. त्यातील सुमारे 65 लाख तरुणांच्या हाताला कामच नसल्याची माहिती मिळाली आहे. यामुळं संघटित गुन्हेगारी वाढण्याची भीती वर्तवण्यात येतेय. यामुळं पाकिस्तानला धोका आहेच त्याचबरोबर भारताची चिंताही वाढण्याची शक्यता आहे.

  भारताच्या अडचणीत होणार वाढ
  पाकिस्तानातील दहशतवादी संघटना या भारतविरोधी कारवाया करण्यासाठी सातत्यानं तरुणांच्या शोधात असतात. कमी पैशांचं आमिष दाखवून त्यांना दहशतवादी करण्यात येतं. बेरोजगारांची संख्या वाढली, तर यातील अनेक तरुण कुटुंबासाठी दहशतवादाचा मार्ग स्वीकारण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीत 2023 या वर्षात सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचं सांगण्यात येतंय. अशा स्थितीत याचा सर्वाधिक धोका भारत आणि काश्मीरसारख्या सीमावर्ती राज्यांना होण्याची भीती आहे. गेल्या काही महिन्यात रिफायनरी, कपडे, लोह, ऑटोमोबाईल यासारख्या क्षेत्रातील उद्योग बंद पडताना दिसतायेत. याचा धोका आगामी काळात भारताला दहशतवादाच्या रुपानं भोगावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.