म्यानमारमध्ये खुनी दिवस, लष्कर दिनी सुरक्षादल आणि सत्तापालटाला विरोध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांत चकमक, ९१ जणांचा मृत्यू

ऑनलाईन न्यूज वेबसाईट म्यानमार नाऊने दावा केला आहे की शनिवारी हिंसक आंदोनात मारले गेलेल्यांची संख्या ९१च्या घरात आहे. यापूर्वी १४ मार्च रोजी ७४ ते ९० जणांचा मृत्य् झाला होता. यांगोनच्या एका संशोधकानुसार २० पेक्षा जास्त शहरात आणि बाजारपेठांमध्ये आंदोलने करण्यात आली.

  यांगोन : म्यानमारमध्ये सत्तापालटाविरोधात सुरु असलेल्या हिंसक विरोधी आंदोलनात, सुरक्षा दल आणि आंदोलनकर्ते यांच्यात झालेल्या चकमकीत सुमारे ९१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. स्थानिक माध्यमांनी हा दावा केला आहे. देशात सैन्याने केलेल्या सत्तापालटानंतर सुरु असलेल्या आंदोलनात एका दिवसात झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत. शनिवारी म्यानमारचा लष्करी दिनही साजरा करण्यात आला, यानिमित्ताने सैन्यदल संचलन करीत आपले शक्तिप्रदर्शनही करीत असते.

  एका न्यूज वेबसाईटने केला सर्वाधिक मृत्यूंचा दावा

  ऑनलाईन न्यूज वेबसाईट म्यानमार नाऊने दावा केला आहे की शनिवारी हिंसक आंदोनात मारले गेलेल्यांची संख्या ९१च्या घरात आहे. यापूर्वी १४ मार्च रोजी ७४ ते ९० जणांचा मृत्य् झाला होता. यांगोनच्या एका संशोधकानुसार २० पेक्षा जास्त शहरात आणि बाजारपेठांमध्ये आंदोलने करण्यात आली. म्यानमारमध्ये सैन्याने केलेल्या सत्तापालटालाविरोधात आणि होत असलेल्या अत्याचाराविरोधात संपूर्ण देशात आंदोलन सुरु आहे. यात आत्तापर्यंत ४०० सर्वसामान्य नागरिकांचा जीव गेला आहे.

  जनरल मीन आंग यांनी स्वीकारली सैन्यदलाची सलामी

  म्यानमारचे जनरल मिन आंग ह्लाइंग यांनी सैन्यदिनाच्या निमित्ताने सैन्याची सलामी स्वीकारली. राजधानी नेपाईतॉमध्ये झालेल्या संचलनात ते सहभागी झाले होते. म्यानमारचे सैन्य नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. त्याआधी शुक्रवारी सरकारी वाहिन्यांनी आंदोलनकर्त्यांच्या पाठीत आणि डोक्यात गोळ्या मारल्या जातील, असा धोक्याचा इशाचा दिला होता. या इशाऱ्यानंतरही यांगोन, मांडले आणि इतर शहरांमध्ये आंदोलनकर्ते रस्त्यांवर उतरले होते. आत्तापर्यंत सुमारे ३ हजार आंदोलोनकर्त्यांना अटकही करण्यात आली आहे.

  फेब्रुवारीत झाला होता सत्तापालट

  म्यानमारच्या सैन्याने फेब्रुवारीच्या सुरुवातीला देशात सत्तापालट केला होता. या काळात नोबेल विजेत्या आणि नेत्या आंग सान यू की यांना अटक करण्यात आली होती, त्यानंतर त्यांची रवानगी अज्ञातस्थळी करण्यात आली आहे, तसेच त्यांच्या पक्षाचे इतर नेतेही अटकेत आहेत. आंग सान सू की यांच्या पक्षाने नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या निविडणुकांत मोठा विजय मिळवला होता. मात्र या निवडणुकीत गोंधळ झाल्याचा आरोप करत सैन्याने सत्तापालट केला. निवडणूक निरीक्षकांनी मात्र मतदानात कोणताही गोंधळ झाल्याचा आरोप फेटाळला आहे.

  सैन्याने काही दिवसांपूर्वी सात वर्षीय मुलीला मारली होती गोळी

  म्यानमारच्या मंडल्य शहरात एका २६ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली, यावेळी काही जण जखमीही झाले होते. याआधी मंगळवारी मंडल्य शहरात वडिलांच्या कडेवर असलेल्या सात वर्षीय मुलीची गोळी मारुन सैन्याने हत्या केली होती. आत्तापर्यंत मारले गेलेल्यांमध्ये ही सर्वात अल्पवयीन मुलगी आहे.