
नवी दिल्ली – अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या स्पेस कंपनी ब्लू ओरिजिनने गुरुवारी सहा जणांना अंतराळ पर्यटनासाठी अवकाशात पाठवले. कंपनीच्या न्यू शेपर्ड अंतराळयानाने टेक्सासमधील प्रक्षेपण साइट वन येथून उड्डाण केले. या यानाने प्रवाशांना पृथ्वीच्या१०७ किमी वर नेले आणि त्यानंतर तेथून पॅराशूटद्वारे लोक पृथ्वीवर परत आले.
या उड्डाणासह ब्लू ओरिजिनने नवा विश्वविक्रमही केला आहे. इजिप्त आणि पोर्तुगालमधील लोक पहिल्यांदाच अवकाश पर्यटनाचा एक भाग बनले. अभियंता सारा साबरी ही पहिली इजिप्शियन आणि उद्योजक मारियो फरेरा अंतराळात जाणारी पहिली पोर्तुगीज बनली. या यात्रेत डूड परफेक्टचे सह-संस्थापक कोबी कॉटन, ब्रिटिश-अमेरिकन गिर्यारोहक व्हेनेसा ओ’ब्रायन, तंत्रज्ञान लीडर क्लिंट केली III आणि दूरसंचार कार्यकारी स्टीव्ह यंग देखील होते.
न्यू शेपर्ड स्पेसक्राफ्टमध्ये रॉकेट आणि कॅप्सूल असते. ही कॅप्सूल लाँच केली जाते. लिफ्ट ऑफच्या वेळेपासून कॅप्सूल पृथ्वीवर येईपर्यंतचा वेळ१० मिनिटे आहे. या दरम्यान अंतराळवीरांना काही काळ ते हलके झाल्याचे वाटते. पॅराशूटद्वारे कॅप्सूल उतरण्यापूर्वी काही मिनिटे आधी रॉकेट उतरते. विशेष बाब म्हणजे, हे दोन्ही पुन्हा वापरता येण्याजोगे आहेत म्हणजेच ते पुन्हा वापरता येतात. हे रॉकेट SpaceX च्या Falcon 9 ऑर्बिटल रॉकेटप्रमाणे काम करते.