जेरुसलेममधे बस स्टॉपवर बॉम्बस्फोट; एक ठार, 18 जखमी

पहिला स्फोट सकाळी ७ च्या सुमारास पश्चिम जेरुसलेममधील गिवत शौल येथील बस स्टॉपच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झाला. शहराचे दुसरे प्रवेशद्वार असलेल्या रामोत जंक्शनवर काही वेळातच दुसरा स्फोट झाला.

    इस्रायल : इस्रायलमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्रायलची राजधानी जेरुसलेममधे बस स्टॉपवर भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत.

    बुधवारी  जेरुसलेमध्ये पाठोपाठ दोन स्फोट झाले. गर्दीच्या ठिकाणांवरील बस थांब्यांना लक्ष्य करण्यात आले होते. या दरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. पहिला स्फोट सकाळी ७ च्या सुमारास पश्चिम जेरुसलेममधील गिवत शौल येथील बस स्टॉपच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झाला. तर, शहराचे दुसरे प्रवेशद्वार असलेल्या रामोत जंक्शनवर काही वेळातच दुसरा स्फोट झाला.

    रिपोर्टनुसार, एक स्फोट बसजवळ ठेवलेल्या हॅण्डबॅगमध्ये ठेवलेल्या बॉम्बमुळे झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आतापर्यंत कोणत्याही गटाने या स्फोटांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, स्फोटाचे नेमके कारण लगेच समजू शकलेले नाही. इस्त्रायली सुरक्षा एजन्सी या स्फोटांशी संबंधित संशयितांचा शोध घेण्यासाठी परिसरात शोध घेत आहेत.