ब्रिटनच्या पंतप्रधानांकडून ब्रेक्झिट करारावर स्वाक्षरी

युरोपीय परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल आणि युरोपीयन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी बुधवारी स्वाक्षरी केली.

लंडन. ब्रिटनच्या संसदेने बुधवारी ब्रेक्झिट कराराला ७३ विरुद्ध ५२१ मतांनी मंजुरी दिली. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युरोपिय संघातून वेगळे होण्याअंतर्गत मुक्त व्यापार कराराला मंजुरी देण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविले होते. दरम्यान, जॉन्सन यांनी ब्रेक्झिट व्यापार करारावरही स्वाक्षरी केली.

ज्या करारावर मी आता स्वाक्षरी केली तो शेवट नसून नवी सुरुवात आहे. माझ्या मते ब्रिटन आणि युरोपियन युनियनमध्ये आपले मित्र देश आणि सहकारी देशांसोबत नव्या संबंधांना सुरुवात होईल.

- बोरिस जॉन्सन, ब्रिटनचे पंतप्रधान

युरोपीय परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल आणि युरोपीयन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी बुधवारी स्वाक्षरी केली. त्यानंतर हे दस्तऐवज रॉयल एअरफोर्सच्या विमानांनी लंडन येथे आणण्यात आले. युरोपियन युनियनपासून (ईयू) वेगळे होण्याअंतर्गत मुक्त व्यापार कराराला (एफटीए) संसदेची मंजुरी घेण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ख्रिसमसच्या सुटीनंतर संसदेचे अधिवेशन बोलावले होते. ब्रेक्झिटसाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्या मुदतीपूर्वीच झालेल्या सहमतीनंतर ८० पानांचे विधेयक ब्रिटनच्या संसदेत सादर करण्यात आले. यापूर्वी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये खासदारांनी यावर चर्चा केली. त्यानंतर हाऊस ऑफ लॉर्डमध्ये या विधेयकावर चर्चा करण्यात आली. दोन्ही सदनांच्या मंजुरीनंतर हे विधेयक ब्रिटनच्या राणीकडे त्यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.