कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांचा आरोप, भारतविरोधी कारवायांबद्दल व्यक्त केली तीव्र चिंता

कॅनडाने भारत सरकारच्या उच्च गुप्तचर सुरक्षा अधिकाऱ्यांकडे आपली चिंता व्यक्त केली. गेल्या आठवड्यात जी-२०मध्ये त्या गोष्टी मी वैयक्तिकरित्या आणि थेट पंतप्रधान मोदींना सांगितल्या होत्या, असा दावा जस्टिन ट्रुडो यांनी केला आहे.

    भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधांमध्ये तणाव वाढताना दिसत आहे. आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येतबाबत मोठं वक्तव्य केले आहे. कॅनडामधील कुख्यात खलिस्तानी दहशतवादी आणि भारतासाठी मोस्ट टेड असलेल्या हरदीप सिंह निज्जर याची १८ जून रोजी कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हरदीप सिंह याच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी हरदीप सिंह निज्जर यांच्यावर झालेल्या गोळीबारामागे भारत सरकारचा हात असल्याचा आरोप केला आहे. जस्टीन ट्रूडो म्हणाले की, देशाच्या सुरक्षा एजन्सी भारत सरकार आणि खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येचा संबंध तपासत आहेत.

    जस्टीन ट्रूडो संसदेत म्हणाले की, आज मला एका अत्यंत गंभीर विषयाची सभागृहाला जाणीव करून द्यायची आहे. मी थेट विरोधी पक्षांच्या नेत्यांना कळवले आहे, पण आता मला सर्व कॅनेडियन लोकांना सांगायचे आहे. गेल्या काही आठवड्यांपासून, कॅनडाच्या सुरक्षा एजन्सी कॅनडाचे नागरिक हरदीप सिंग निज्जर आणि भारत सरकार यांच्यातील संभाव्य कनेक्शनच्या विश्वसनीय आरोपांची सक्रियपणे चौकशी करत आहेत. कॅनडा हा कायद्याचे पालन करणारा देश आहे. आपल्या नागरिकांची सुरक्षा आणि आपल्या सार्वभौमत्वाचे संरक्षण मूलभूत आहे. आमच्या सुरक्षा एजन्सी आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींनी सर्व कॅनेडियन लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

    जी-२० परिषदेतही त्यांनी हा मुद्दा (खलिस्तानी) पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मांडला होता. कॅनडाने भारत सरकारच्या उच्च गुप्तचर सुरक्षा अधिकाऱ्यांकडे आपली चिंता व्यक्त केली. गेल्या आठवड्यात जी-२०मध्ये त्या गोष्टी मी वैयक्तिकरित्या आणि थेट पंतप्रधान मोदींना सांगितल्या होत्या, असा दावा जस्टिन ट्रुडो यांनी केला आहे. त्याचवेळी, जी-२० शिखर परिषदेच्या बाजूला झालेल्या बैठकीत, पंतप्रधान मोदींनी जस्टिन ट्रूडो यांच्याकडे कॅनडातील अतिरेकी घटकांकडून केल्या जात असलेल्या भारतविरोधी कारवायांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली होती.