parent scolding children

जगात असे बरेच देश आहेत जिथे मुलांवर हात उचलणं बेकायदेशीर (Illegal) आहे. जर आपण या देशांमध्ये मुलाला मारताना पकडले गेलो तर आपल्याला थेट तुरुंगात(Child Spanking Is Crime) जावं लागतं.

    नवी दिल्ली: मुलांच्या खोडसाळपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालकांना कधीकधी मुलांना मारावे(Child Spanking) लागते. मात्र जगात असे बरेच देश आहेत जिथे मुलांवर हात उचलणं बेकायदेशीर (Illegal) आहे. जर आपण या देशांमध्ये मुलाला मारताना पकडले गेलो तर आपल्याला थेट तुरुंगात(Child Spanking Is Crime) जावं लागतं. यात युरोपमधील अनेक देशांचा समावेश आहे.

    नुकतीच ब्रिटनमधील तज्ज्ञांनी देशातील मुलांवर हात उचलणं बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, की मुलांना मारहाण करून त्यांच्यात कोणतीही सुधारणा होत नाही. उलट, त्यांचं वागणं अधिक हिंसक होतं. याचा पुरावाही सापडला आहे. सध्या इंग्लंडसह इतर चार युरोपीय देशांममध्ये मुलांवर हात उचलणं कायदेशीर आहे. अशा परिस्थितीत तज्ज्ञांनी हे थांबविण्याचे आवाहन केले आहे. यावर अद्याप बरीच चर्चा होणं बाकी आहे.

    युरोपमधील बर्‍याच देशांमध्ये पालक आपल्या मुलांवर हात उचलू शकत नाहीत. मात्र इंग्लंडमध्ये विशिष्ट परिस्थितीत मुलांना शिक्षा देण्यासाठी याला परवानगी आहे. या व्यतिरिक्त स्कॉटलंडमध्ये १६ वर्षाच्या मुलांना शिक्षा देण्यासाठी काही कायदे बनविण्यात आले असून वेल्समध्येही अशा प्रकारचे काही कायदे राबविण्याचे काम चालू आहे. तज्ज्ञांच्या मते सरकारने यावर कडक बंदी घालायला हवी. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या मते मारण्यामुळे मुलांवर चांगला परिणाम होत नाही. याउलट ती अधिकच आक्रमक होतात.

    गेली २० वर्षे विद्यापीठाने या दिशेने संशोधन केले. यामध्ये सुमारे ६९ मुलांचा समावेश करण्यात आला आणि त्यांच्यावरील हिंसाचाराच्या परिणामाचा अभ्यास केला गेला. यात असं आढळलं आहे की, १६ वर्षे वयाखालील मुले, ज्यांना अशा प्रकारे मारण्यात आलं आहे, ते मोठे होऊन आक्रमक व समाजासाठी धोकादायक ठरले. युसीएल महामारी व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अग्रगण्य लेखक डॉ. अंजा हिलमॅन यांच्या म्हणण्यानुसार, शारीरिक शिक्षा मुलासाठी किंवा कुटुंबातील सदस्यांसाठीही फायदेशीर ठरत नाही. अशात ज्या देशांमध्ये अजूनही मुलांना चापट मारणं कायदेशीर आहे, तिथे तात्काळ या वर बंदी घालायला हवी, असं त्यांनी म्हटलं.