
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुधवारी हा चिनी गुप्तहेर फुगा मोंटाना परिसरात उडत होता. सध्या या फुग्यावर लक्ष ठेवले जात आहे.
अमेरिका (America) आणि चीन (China) यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान अमेरिकेच्या हवाई क्षेत्रात कथित चिनी गुप्तहेर फुगा (Chinese spy balloon found in America) दिसल्यानंतर गुप्तचर यंत्रणा सतर्क झाली आहे. या फुग्याचा ( (balloon)) आकार तीन बसेसएवढा असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड या फुग्यावर सतत लक्ष ठेवून आहे.
फुगा धोकादायक?
पेंटागॉनने (Pentagon) पेंटागॉनचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल पॅट रायडर यांनी सांगितले की, अमेरिकन सरकारला सध्या अमेरिकन उपखंडावर उडणारा एक उंच फुगा सापडला आहे. या गुप्तचर फुग्यांबद्दल माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब संवेदनशील डेटा सुरक्षित केला जेणेकरून तो दुसऱ्या कुणाच्याही हातात लागणार नाही. मात्र, या गुप्तचर फुग्यात असे काहीही नाही की ज्यामुळे लोकांना किंवा लष्कराला कोणताही धोका पोहोचू शकेल.
फुगा न पाडण्याचे आदेश
हा चिनी गुप्तहेर फुगा अशा वेळी अमेरिकेत दिसला आहे जेव्हा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन (Secretary of State Antony Blinken) लवकरच बीजिंगला भेट देणार आहेत. यूएस जॉइंट चीफ ऑफ स्टाफ जनरल मार्क मायली आणि यूएस नॉर्दर्न कमांडचे जनरल ग्लेन व्हॅनहर्क यांनी फुगा न पाडण्याची सूचना केली आहे. तो पाडल्यास लोकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या भागात असलेल्या हवाई दलाच्या तळावर अमेरिकेची तीन आण्विक क्षेपणास्त्रे तैनात आहेत. हा गुप्तचर फुगा नागरी हवाई उड्डाणांच्या मर्यादेच्या वर उडत आहे. हा फुगा किती उंचीवर उडतो हे अमेरिकेने सांगितले नसले तरी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी चीन आणि अमेरिका यांच्यात तैवानच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला होता. या मुद्द्यावर अमेरिकी अधिकाऱ्यांनी चिनी अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे.