dell

डेल टेक्नॉलॉजी (Dell Technology) मधील कमर्चाऱ्यांवर नोकर कपातीची टांगती तलवार आहे. डेल कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 5 टक्के कमर्चाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे.

  सध्या जागतिक आर्थिक मंदीमुळे अनेक कंपन्यांमध्ये कमर्चाऱ्यांची कपात करत आहेत. यामध्ये  ट्विटर (Twitter), मेटा (Meta) आणि ॲपल (Apple ), ॲमेझॉन (Amazon), मायक्रोसॉफ्ट (Microsoft) अशा अनेक आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. या कपातीमुळे भारतातील कंपन्यांनासुद्धा अडचणींचा सामना करावा लागला आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, आता डेल टेक्नॉलॉजी ( Dell Technology) मधील कमर्चाऱ्यांवर नोकर कपातीची टांगती तलवार आहे. डेल कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 5 टक्के कमर्चाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. याचाच अर्थ डेल कंपनी 6,650 कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये कर्मचाऱ्यांची कपात करणारी डेल ही प्रमुख लॅपटॉप कंपन्यांपैकी पहिली कंपनी आहे. एका अहवालानुसार कंपनीचे को-चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जेफ क्लार्क यांनी सांगितले की, कंपनी बाजारातील परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे भविष्यात कंपनी कर्मचारी कपात करु शकते.

  को-चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जेफ क्लार्क यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या नोटमध्ये ते म्हणतात की, “आम्ही या आधीही आर्थिक मंदीचा सामना केला आहे. त्यामुळे आम्ही अधिक मजबूत झालो आहोत. याआधी 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात देखील आम्ही टाळेबंदीची घोषणा केली होती. नोव्हेंबर महिन्यात एचपीने जाहीर केले होते की, पर्सनल कॉम्प्युटर्सची मागणी कमी होत आहे. ज्यामुळे पुढील तीन वर्षात 6,000लोकांना कामावरून कमी केले जाऊ शकते.”

  पर्सनल कॉम्प्यूटरची मागणी घटली
  उद्योग विश्लेषक IDC ने सांगितले की, 2022 च्या चौथ्या तिमाहीमधील आकडेवारीनुसार  पर्सनल कॉम्प्यूटरच्या मागणीत खूप घट होत आहे.  सर्व प्रमुख कंपन्यांमध्ये डेलने या कालावधीत 2021 मध्ये 37 टक्क्यांनी घसरण झालेली पहिली आहे. डेल कंपनीच्या कमाईमध्ये 55 टक्के वाटा हा पीसी अर्थात पर्सनल कॉम्प्यूटरचा आहे.

  फिलिप्समध्येही कर्मचारी कपात
  ग्लोबल टेक कंपनी फिलिप्सनेही (Philips)कपातीची घोषणा केली आहे. कंपनीच्या मते एकूण ग्लोबल कर्मचाऱ्यांपैकी 6000 लोकांना कंपनी कामावरून काढून टाकणार आहे. फिलिप्सचे सीईओ रॉय जॅकब्स (Roy Jakobs) यांनी एक निवेदन जाहीर करत 2025 पर्यंत आणखी काही कर्मचाऱ्यांना कमी करण्याची घोषणा केली आहे. कंपनीला होत असलेल्या नुकसानामुळे जगभरात 6,000 लोकांना कामावरून काढण्यात येईल.