युक्रेनच्या सततच्या स्फोटांनी मॉस्को हादरला, आता पुतिन यांच्या कार्यालयापासून ५ किमी दूर मोठा ड्रोन हल्ला!

युक्रेनने रशियावर ड्रोन हल्ले केल्यानंतर मॉस्कोचे वनुकोवो विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहे. महापौर सोब्यानिन यांनी सांगितले की या घटनेत जीवीतहाना झाली नाही. मात्र, या ड्रोन हल्ल्यामुळे इमारतीच्या 21व्या मजल्याच्या बाहेरील भागाचे नुकसान झाले आहे.

  रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध (Ukrain Russia War) आता धोकादायक वळण घेत आहे.अमेरिकेसह युरोपातील सर्व देशांकडून शस्त्रे मिळाल्यानंतर युक्रेनने आता रशियाच्या भूमीवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये तीन दिवसांत झालेला हा तिसरा हल्ला (Drone Attack on Moscow)आहे. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी मंगळवारी सकाळी सांगितले की, या हल्ल्यात एका व्यावसायिक इमारतीला लक्ष्य करण्यात आले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या कार्यालयापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर हा हल्ला झाला.

  व्लादिमीर झेलेन्स्कींची प्रतिक्रिया

  या हल्ल्यांची जबाबदारी घेत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, जर रशियाने आपल्या भूमीवरील हल्ले थांबवले नाहीत तर ते आपल्या जमिनीवर दहशत माजवण्यापासून मागे हटणार नाहीत. आता रशियाची जमीन हादरवण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे पुतिन यांनी युक्रेनने हल्ले न थांबवल्यास गप्प बसणार नाही, असा इशारा दिला आहे.

  मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी मंगळवारी एका निवेदनात सांगितले की, रशियन हवाई संरक्षण दलाने मॉस्को क्षेत्राला लक्ष्य करणारे अनेक ड्रोन पाडले आहेत. मात्र, एका व्यावसायिक इमारतीला लक्ष्य करण्यात आले. दोन्ही ड्रोन हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याच सांगण्यात आलं आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या कार्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर हा हल्ला झाला.

  युक्रेनच्या हवाई हल्ल्यानंतर मॉस्कोचे विमानतळ बंद

  युक्रेनने रशियावर ड्रोन हल्ले केल्यानंतर मॉस्कोचे वनुकोवो विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहे. महापौर सोब्यानिन यांनी सांगितले की या घटनेत जीवीतहाना झाली नाही. मात्र, या  ड्रोन हल्ल्यामुळे इमारतीच्या 21व्या मजल्याच्या बाहेरील भागाचे नुकसान झाले आहे.

  युक्रेनचे हल्ले फसल्याचा रशियाचा दावा

  रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, मॉस्कोजवळील ओडिंतसोवो आणि नारोफोमिन्स्क जिल्ह्यांमध्ये हवाई संरक्षण यंत्रणेने दोन ड्रोन नष्ट केले.हे ड्रोन नष्ट झाल्यानंतर इमारतींवर पडले, त्यामुळे इमारतींचे किरकोळ नुकसान झाले. रशिया युक्रेनच्या हल्ल्याचे वर्णन जगासमोर छोटे आणि कुचकामी असे करत असेल, पण प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की, मॉस्कोवरील ड्रोन हल्ल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.