
दुबई सरकार जगातील पहिलं पेपरलेस सरकार (Dubai Is Now Worlds First Paperless Country) ठरलं आहे. यामुळे ३५ कोटी अमेरिकन डॉलर्स (Saves 350 Million Dollars) आणि १४ कोटी तासांची बचत होणार आहे.
सरकारी कार्यालयं म्हटलं की अनेक फाईल्स आणि पेपरचा गठ्ठा हा असतोच. त्यामुळे एखादं सरकारी काम करायचं म्हटलं पेपर शोधण्यापासून ते मिळवण्यापर्यंत पैशांसोबत वेळही वाया जातो. अनेकदा पेपर गहाळ किंवा खराब होण्याची शक्यता असते. मात्र अशा सगळ्या पार्श्वभूमीवर दुबई सरकार जगातील पहिलं पेपरलेस सरकार(Dubai Is Now Worlds First Paperless Country) ठरलं आहे. यामुळे ३५ कोटी अमेरिकन डॉलर्स(Saves 350 Million Dollars) आणि १४ कोटी तासांची बचत होणार असल्याचं अमीरातचे क्राउन प्रिन्स शेख हमदान(Prince Sheikh Hamdam) बिन मुहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी म्हटलं आहे.
दुबईमध्ये पेपरलेस योजना सलग पाच टप्प्यांमध्ये राबविण्यात आली. प्रत्येक टप्प्यात सरकारच्या विविध गटांचा समावेश करण्यात आला होता. शेवटच्या आणि पाचव्या टप्प्यात अमिरातीमधील सर्व ४५ सरकारी विभागांमध्ये ही योजना लागू करण्यात आली. या विभागात १,८०० डिजिटल सेवा आणि १०,५०० पेक्षा जास्त व्यवहार होत आहेत.
“दुबई सरकारमधील सर्व अंतर्गत, बाह्य व्यवहार आणि सर्व प्रक्रिया आता १०० टक्के डिजिटल आहेत. सर्वसमावेशक डिजिटल सरकारी सेवा मंचाद्वारे व्यवस्थापित केल्या जातात. या ध्येयाची प्राप्ती म्हणजे दुबईच्या जीवनातील सर्व पैलू डिजिटल करण्याच्या प्रवासातील एका नवीन टप्प्याची सुरुवात आहे.”, असं शेख यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
कागदांच्या कटकटीपासून सुटका झाल्याने आता दुबईतील नागरिकांना स्मार्ट सिटीची अनुभूती मिळत आहे. सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याऐवजी एका क्लिकवर काम होत आहे. त्याचबरोबर वेळेची बचत होत असल्याने कुटुंबाला वेळ देता येत आहे. दुसरीकडे अमेरिका, इंग्लंड, युरोप आणि कॅनडाने सरकारी कामकाज मोठ्या प्रमाणावर डिजिटायझेशन करण्याची योजना केली जात आहे. दरम्यान, काही अधिकाऱ्यांनी सायबर हल्ल्यांच्या असुरक्षिततेचा युक्तिवाद केला आहे.