न्युक्लियर कागदपत्रांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर एफबीआयचा छापा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा 'मार-ए-लागो' या निवासस्थानी अमेरिकन केंद्रीय अन्वेषण विभागने (FBI) छापेमारी केली होती. यादरम्यान एफबीआयने तिथून कागदपत्रांनी भरलेले डझनभर बॉक्स ताब्यात घेतले होते. तसेच, ट्रम्प घरी नसताना हे छापे मुद्दाम टाकले. ट्रम्प यांच्या उपस्थितीचा कारवाईवर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता अधिकाऱ्यांना होती.

    वॉशिंग्टन : अमेरिकेची तपास संस्था एफबीआयने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील घरावर छापा टाकला होता. याबाबत, एफबीआयने आण्विक कागदपत्रांसह (Nuclear Documents) इतर वस्तूंच्या शोधात सदर छापा टाकल्याचे सांगण्यात येत आहे. वॉशिंग्टन पोस्टने सूत्रांच्या हवाल्याने हा मोठा दावा केला.

    डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा (Florida) ‘मार-ए-लागो’ (Mar-A-Lago) या निवासस्थानी अमेरिकन केंद्रीय अन्वेषण विभागने (FBI) छापेमारी केली होती. यादरम्यान एफबीआयने तिथून कागदपत्रांनी भरलेले डझनभर बॉक्स ताब्यात घेतले होते. तसेच, ट्रम्प घरी नसताना हे छापे मुद्दाम टाकले. ट्रम्प यांच्या उपस्थितीचा कारवाईवर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता अधिकाऱ्यांना होती. तसेच, ट्रम्प या छापेमारीचा फायदा आपल्या राजकीय फायद्यासाठीही करु शकतात, अशीही शक्यता अधिकाऱ्यांना होती, असा खुलासा करण्यात आला आहे.

    ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडल्यानंतर फ्लोरिडामध्ये आणलेली राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाशी संबंधित अधिकृत कागदपत्रे शोधण्यासाठी एफबीआयने छापा मारल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या न्याय विभाग ट्रम्प यांच्याविरोधातील दोन प्रकरणांची चौकशी करत आहे. २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल उलटवण्याच्या प्रयत्नाशी संबंधित पहिले प्रकरण आणि कागदपत्रे हाताळण्यासंदर्भातील दुसरे प्रकरण, यासंदर्भात सध्या चौकशी सुरु आहे.

    एफबीआयच्या मते, एजन्सी प्रेसिडेंशियल रेकॉर्ड्स ॲक्ट आणि वर्गीकृत साहित्य हाताळणी कायद्यांच्या संभाव्य उल्लंघनांची चौकशी करत आहे. नॅशनल आर्काइव्हज अँड रेकॉर्ड ॲडमिनिस्ट्रेशनने (NARA) २०२२ मध्ये व्हाईट हाऊसच्या रेकॉर्डचे १५ बॉक्स जप्त केले. हे बॉक्स ‘मार-ए-लागो’ला पाठवले. त्यावेळी, नियमांनुसार कागदपत्रांनी भरलेले हे बॉक्स ट्रम्प जेव्हा व्हाईट हाऊसमधून बाहेर पडले, तेव्हा नॅशनल आर्काइव्हजला पाठवायचे होते.