अफगाण-तालिबान शांतता कराराबाबत भारताशी चर्चा, अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांनी मांडले हे मुद्दे

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री हनीफ अतमर यांनी या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानचे नेते आणि अमेरिकापुरस्कृत अफगाणिस्तान सरकारचे प्रतिनिधी यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत. या प्रक्रियेत शेजारील देशांना सामावून घेण्याचा प्रयत्न अफगाणिस्तान करतंय. अफगाणिस्तान आणि भारत यांचे पारंपारिक व्यापारी संबंध देखील आहेत. 

    भारताचा अत्यंत महत्त्वाचा शेजारी देश अफगाणिस्तानमध्ये सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेषतः अमेरिकेनं अफगाणिस्तानधील सैन्य मागे घेण्याचा घेतलेला निर्णय आणि त्याबदल्यात तालिबाननं अमेरिका पुरस्कृत अफगाणिस्तान सरकारशी करण्याच्या शांततेच्या वाटाघाटी ही प्रक्रिया गेल्या वर्षीपासून सुरू झालीय. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताशी चर्चा केलीय.

    अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री हनीफ अतमर यांनी या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानचे नेते आणि अमेरिकापुरस्कृत अफगाणिस्तान सरकारचे प्रतिनिधी यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत. या प्रक्रियेत शेजारील देशांना सामावून घेण्याचा प्रयत्न अफगाणिस्तान करतंय. अफगाणिस्तान आणि भारत यांचे पारंपारिक व्यापारी संबंध देखील आहेत.

    पाकिस्तान आणि तालिबान यांची जवळीक आहे, तर भारत सरकार आणि अफगाणिस्तानमधील विद्यमान सरकार यांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये सध्याचं सरकार राहणं आणि तालिबानचा कमीत कमी वाटा सत्तेत राहणं हेच भारताच्या हिताचं असेल, असं सांगितलं जातंय.

    दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेत द्विपक्षीय संबंध सुधारणे, अफगाण शांतता कराराबाबत स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय सहमती मिळवणे, आर्थिक देवाणघेवाण आणि व्यापारी संबंध त्याचप्रमाणे दोन्ही देशातील दळणवळण या विषयांवर मुख्यत्वे चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली.