donald trump

अमेरिकेतील 2020 च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर ट्रम्प समर्थकांनी 6 जानेवारी 2021 ला संसदेच्या परिसरात हिंसा केली होती. त्यानंतर ट्रम्प यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बंदी घालण्यात आली होती.

वॉशिंग्टन:अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर दोन वर्षांसाठी फेसबुक आणि यूट्युबवर बंदी घालण्यात आली होती. आता या बंदीचा कालावधी संपला आहे. दोन वर्षांनंतर त्यांनी आज फेसबुकवर (Donald Trump Back On Facebook) पहिल्या पोस्टमध्ये ‘मी पुन्हा आलोय’(I Am back) असं म्हटलं आहे.

दोन वर्षांनतर केलेल्या पहिल्या पोस्टमध्ये त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे ज्यात ते म्हणतायत की, “तुम्हाला इतकी वाट बघायला लावल्याबद्दल माफी मागतो. ” त्यांनी हा व्हिडिओ यूट्यूबवरदेखील शेअर केला आहे. यूट्यूबने शुक्रवारी ट्रम्प यांच्या यूट्युब चॅनलवरची बंदी हटवल्याची घोषणा केली.

अमेरिकेतील 2020 च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर ट्रम्प समर्थकांनी 6 जानेवारी 2021 ला संसदेच्या परिसरात हिंसा केली होती. त्यानंतर ट्रम्प यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बंदी घालण्यात आली होती. फेसबुकची मालकी असलेल्या मेटाने यावर्षी जानेवारीमध्ये येत्या काही आठवड्यांमध्ये ट्रम्प यांना फेसबुक अकाऊंट पुन्हा वापरता येईल, असं सांगितलं होतं. मेटाने 9 फेब्रुवारीला ट्रम्प यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरची बंदी उठवली.

त्यावेळी मेटातील जागतिक विषयांना हाताळणारे निक क्लेग यांना सांगितलं होतं की,“ लोकांना त्यांचा नेता काय सांगतोय हे जाणून घेण्याची, ऐकण्याची संधी मिळाली पाहिजे. मग ते चांगलं असो वा वाईट. त्यांचं म्हणणं ऐकून मतदानावेळी त्यांचा पर्याय निवडायला त्यांना मदत व्हायला हवी.”

यूट्युबची घोषणा
यूट्युबने शुक्रवारी ट्विट केलं की, “आजपासून डोनाल्ड ट्रम्प यांच्या चॅनलवरील बंदी हटवण्यात येत आहे. या चॅनलवर नवीन कंटेंट शेअर करता येईल. कंपनीने पुढे म्हटलं की, “ निवडणुकीआधी मतदारांना प्रमुख उमेदवारांचे विचार ऐकण्याची संधी देण्यासाठी आम्ही वास्तविक जगातील हिंसेच्या धोक्याचं सावधानपूर्वक आकलन केलं आहे”

ट्विटरवर आधीच पुनरागमन
याआधी ट्विटरचा कारभार एलन मस्क यांनी हाती घेतल्यानंतर ट्रम्प यांना त्यांचं ट्विटर अकाऊंट परत वापरण्याची संधी दिली. मात्र ट्रम्प यांनी अद्याप काही ट्विट केलेलं नाही. ते त्यांचं सोशल मीडिया व्यासपीठ असलेल्या ‘ट्रूथ सोशल’वर पोस्ट शेअर करत असतात. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बंदी आल्यानंतर त्यांनी ट्रुथ सोशल लाँच केलं.