पाकिस्तानात माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटकेचा ड्रामा; पोलिस आणि समर्थकांमध्ये झटापट, गाड्या पेटवल्या, अनेक जण जखमी!

इम्रान खान यांच्या लाहोरमधील घराला मोठ्या संख्येने पोलिसांनी घेराव घातला आहे. तोशाखाना प्रकरणी इम्रान खान विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले असून अनेक प्रयत्न करूनही इस्लामाबाद पोलीस इम्रानला अटक करू शकले नाहीत.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Former Prime Minister of Pakistan Imran Khan) यांना अटक करणं म्हणजे  पाकिस्तान सरकारच्या नाकी नऊ आले आहे. त्यामुळेच आता पाकिस्तानी पोलिसांना इम्रान खानला पकडण्यासाठी बळाचा वापर करावा लागत आहे. काल त्यांना अटक होणार असल्याचं सांगण्यात येत होत. मात्र, मंगळवारी संध्याकाळी पाकिस्तान पोलिसांनी इम्रान खानला अटक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा इम्रानचे समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यावेळी इम्रान यांचे समर्थक आणि पोलिस यांच्यात चकमक झाली. पोलिसांनी इम्रान समर्थकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या तर, प्रत्त्युत्तरात इम्रानच्या समर्थकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.

चकमकीत अनेक जखमी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोठ्या संख्येने पोलिसांनी इम्रान खान यांच्या लाहोरमधील घराला वेढा घातला आहे. तोशाखाना प्रकरणी इम्रान खान विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले असून अनेक प्रयत्न करूनही इस्लामाबाद पोलीस इम्रानला अटक करू शकले नाहीत. त्यामुळेच आता पाकिस्तान पोलीस बळाचा वापर करत आहेत. पोलिस आणि इम्रान समर्थकांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत दोन्ही बाजूचे अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

इम्रान खान यांनी व्हिडिओ संदेश जारी केला

याआधी मंगळवारी संध्याकाळी इस्लामाबाद पोलीस इम्रान खानला अटक करण्यासाठी पोहोचले होते. ज्यावर इम्रान खान यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यात त्याने म्हटले आहे की, पोलीस त्याला पकडण्यासाठी आले आहेत आणि मला तुरुंगात टाकायचे आहे. मला काहीही झाले तरी हा देश इम्रान खानशिवायही संघर्ष करत राहील हे तुम्हाला सिद्ध करावे लागेल. बुधवारी सकाळी देखील इम्रान खानने सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी दावा केला की, नवाझ शरीफ यांच्यावरील सर्व खटले संपवण्यासाठी त्यांची अटक लंडनची योजना आहे.

नेमकं प्रकरण काय?

तोशाखाना प्रकरणात कोर्टात हजर न राहिल्याने आणि गेल्या वर्षी एका जाहीर सभेला संबोधित करताना एका महिला न्यायाधीशाला धमकावल्याबद्दल खान यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. खान विरुद्ध दोन अजामीनपात्र अटक वॉरंट जारी झाल्यानंतर, इस्लामाबाद पोलीस पीटीआय प्रमुखाला अटक करण्यासाठी एका विशेष हेलिकॉप्टरने लाहोरला आले, त्यानंतर त्यांनी त्यांच्या जमान पार्क निवासस्थानापासून मोर्चाचे नेतृत्व केले, द एक्सप्रेस ट्रिब्यूनने वृत्त दिले आहे.