भारतासोबत चांगले संबंध आहेत आणि राहतील- बायडेन

    युक्रेनवरील (Ukraine) हल्ल्यानंतर अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर (Russia) आर्थिक निर्बंध लादले. मात्र, भारताने आपला व्यवसाय सुरूच ठेवला. त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध बिघडण्याची चर्चा होती. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारतासोबतच्या संबंधांवर मोठे विधान केले आहे. दोनदा भारताला भेट दिली असून एकदा जाणार आहे. तसेच, भारतासोबत आमचे चांगले संबंध आहेत आणि कायम राहतील, असे जो बायडेन म्हणाले.

    बायडेन यांच्या आधी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस (Ned Price) म्हणाले, आमच्या भारतीय भागीदारांशी आम्ही अनेकवेळा चर्चा केल्या आहेत. सर्व मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर, आम्ही मानतो की प्रत्येक देशाचे रशियाशी वेगळे संबंध आहेत आणि ते असू शकतात. भारताचे रशियासोबतचे संबंध अनेक दशकांपासून विकसित झाले आहेत. मात्र, त्यावेळी अमेरिका भारताशी भागीदारी करायला तयार नव्हती, असेही ते म्हणाले.

    प्राइस पुढे म्हणाले, भारतीय भागीदारांसोबत आमचा ‘टू प्लस टू’ संवाद फार पूर्वी झाला होता. टू प्लस टू संदर्भात आम्ही पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी चर्चा करू. टू प्लस टूमध्ये भारताव्यतिरिक्त, आमच्याकडे संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि इस्रायल(Israel)देखील आहे. भारत आमच्यासोबत अनेक भागीदारींमध्ये सामील होत आहे, यामध्ये अर्थातच क्वाडचा (Quad) समावेश आहे, असेही प्राइस म्हणाले.

    क्वाडमध्ये जपान, भारत, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांचा समावेश आहे. आम्ही आमच्या भारतीय भागीदारांशी अनेक चर्चा केल्या आहेत. आता आमची रणनीती अशी आहे की, प्रत्येक देशाचे रशियाशी वेगळे संबंध असतील. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध खरे तर माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या कार्यकाळात वाढू लागले. माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कारकिर्दीत अमेरिकेची भारतासोबतची भागीदारी आणखी मजबूत झाली, असेही त्यांनी सांगितले.