‘माफ करा’ गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंनी मागितली माफी! कंपनीतील १२ हजार लोकांना दाखवला बाहेरचा रस्ता

पिचाई यांनी म्हण्टलंय की, आम्ही १२ हजार कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यूएसमधील प्रभावित कर्मचार्‍यांना एक वेगळा ईमेल आधीच पाठविला गेला आहे.

  गेल्या काही दिवसापासून तंत्रज्ञान क्षेत्रात होणारी नोकरकपात थांबायच नाव घेत नाही. आता या नोकरकपातीच्या फेऱ्यात जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलही (Google ) आलयं. गुगलची मूळ कंपनी असलेली अल्फाबेट इंकने 12,000 कर्मचार्‍यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला (Google Lay Off) आहे. वृत्तानुसार, कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी या नोककपातीची संपूर्ण जबाबदारी घेत माफी मागितली आहे. नुकतचं गुगलची प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्ट कॉर्पनेही 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार असल्याचेही म्हटले आहे.

  Alphabet मधील टाळेबंदीमुळे कंपनीच्या अभियांत्रिकी आणि उत्पादन संघातील भरती आणि कॉर्पोरेट ऑपरेशन्सवर परिणाम होईल. वृत्तसंस्था रॉयटर्ससोबत शेअर केलेल्या स्टाफ मेमोमध्ये, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांनी सांगितले की अल्फाबेट इंक 12,000 नोकऱ्या काढून टाकत आहे.

  सुंदर पिचाई यांनी माफी मागितली

  पिचाई यांनी म्हण्टलंय की, आम्ही १२ हजार कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यूएसमधील प्रभावित कर्मचार्‍यांना एक वेगळा ईमेल आधीच पाठविला गेला आहे. याचा अर्थ असा आहे की आमच्याबरोबर कठोर परिश्रम केलेल्या काही प्रतिभावान लोकांना निरोप देण्याची वेळ आली आहे. पिचाई यांनी पुढे लिहिले की, या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी घेतो आणि सर्वांची माफी मागतो.

  AI मध्ये गुंतवणूक

  गुगलने सांगितले की, या टाळेबंदीचा परिणाम आतापासून अमेरिकेसह जगभरातील कर्मचाऱ्यांवर होणार आहे. ही बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा तंत्रज्ञान क्षेत्र आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. गुगल आणि मायक्रोसॉफ्ट जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणून ओळखल्या जाणार्‍या काही सॉफ्टवेअरवर गुंतवणूक करत आहेत.