चीनच्या इशाऱ्यानं इम्रान खान यांना अटक झालीये का? पाकिस्तान जळत असताना ड्रॅगनबाबत उपस्थित होतायेत शंका

हा विरोध मोडून काढण्यासाठी पाकिस्तानी सैन्यही सरसावलेलं आहे. रात्रभर या विरोधक आंदोलकांना हटवण्यासाठी गोळीबार करण्यात आलाय. यात अनेक जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. या सगळ्यात इम्रान खान यांची अटक चीनच्या इशाऱ्यावर झालीये का, असा प्रश्न आता विचारण्यात येतोय. चीनचे परराष्ट्र मंत्री यांच्या दौऱ्याशी या अटकेला जोडण्यात येतंय.

    इस्लामाबाद– पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर (Pakistan Imran Khan Arrest) पाकिस्तानात गृहकलहाची स्थिती निर्माण झालेली आहे. इम्रान खान यांचे समर्थक संपूर्म देशात हिंसाचार करण्यासाठी रस्त्यांवर उतरलेले आहेत. इम्रान खान यांचा राजकीय पक्ष तहरीक-ए-इन्साफच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या टार्गेटवर पाकिस्तानी सैन्य आहे. इम्नान समर्थकांनी मंगळवारी संध्याकाळपासून अनेक सैन्याच्या तळांवर हल्ले (Attack) करुन आगी लावल्या आहेत. पाकिस्तानी सैन्याच्या (Army) मुख्यालयही ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हा विरोध मोडून काढण्यासाठी पाकिस्तानी सैन्यही सरसावलेलं आहे. रात्रभर या विरोधक आंदोलकांना हटवण्यासाठी गोळीबार करण्यात आलाय. यात अनेक जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. या सगळ्यात इम्रान खान यांची अटक चीनच्या इशाऱ्यावर झालीये का, असा प्रश्न आता विचारण्यात येतोय. चीनचे परराष्ट्र मंत्री यांच्या दौऱ्याशी या अटकेला जोडण्यात येतंय.

    चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर अटक

    चीनचे परराष्ट्र मंत्री किन गांग हे दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले होते. यापूर्वी पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख असीम मुनीर यांनी चीनचा दौरा केला होता. चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इस्लामाबादेत केलेल्या एका वक्तव्यानं वादही झाला होता. ते म्हणाले होते की, स्थैर्य हा विकासाचा आधार आहे. एक शेजारी आणि मित्र राष्ट्र म्हणून आम्ही इमानदारीने ही आशा करतो आहोत की, पाकिस्तानातील राजकीय पक्ष सहमती निर्माण करतील आणि स्थैर्य राखतील. यातूनच देशांतर्गत आणि परदेशी आव्हानांचा सामना करता येणार आहे.

    चीननं पाकिस्तानात हस्तक्षेप केलाय का?

    चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्याकडं, चीन पाकिस्तानात हस्तक्षेप करत असल्याच्या दृष्टीकोनातून पाहण्यात आलं. चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनंतर चीनचे संरक्षणमंत्रीही पाकिस्तानात पोहचले. त्यांनी सीपीईआयमध्ये होत असलेल्या विलंबाबत नाराजी व्यक्त केलीय. चीन कोणत्याही देशाच्या अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप करीत नसे, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. जर चीन पाकिस्तानबाबत असं वक्तव्य करत असेल, तर पाकिस्तानच्या समोर कोणतं वादळं घोंगावतंय. याचा अंदाज यायला हवा, असंही तज्ज्ञांचं मत आहे. अशा स्थितीत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी देश सोडताच इम्रान खान यांच्या अटकेकडं वेगळ्या नजरेतून पाहण्यात येतंय.

    चीनचा अमेरिकेला मात देण्याचा प्रयत्न

    पाकिस्तानात इम्रान खान अमेरिकेशी संबंध मजबूत करण्याच्या प्रयत्नात होते. तर शहबाज शरीफ सरकार आणि लष्करप्रमुख असीम मुनीर चीनच्या जवळ जाण्याच्या प्रयत्नात आहेत. इम्रान यांचे नीकटवर्तीय आणि माजी केंद्रीय मंत्री फवाद चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या राजदुतांशी चर्चा केली होती. तर चीनची सीपीईआय योजना पुढे जावी, अशी इच्छा आहे. मात्र इम्रान खान यांच्या विरोधी राजकारणामुळं या योजनेत अडथळा निर्माण झाला होता. ही योजना नवाज शरीफ आणि इम्रान खान यांनीच सुरु केली होती.

    चीनच्या जाळ्यात अडकतोय पाकिस्तान

    यापूर्वी अमेरिकेच्या माध्यमांनी काही गुप्त माहितींच्या आधारे, पाकिस्तान आता चीनच्या दिशेने सरकत असल्याचा गौप्यस्फोट केला होता. पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्य मंत्री हिना रब्बानी खार यांनी शहबाज शरीफ यांच्या भेटीत अमेरिकेऐवजी चीनसोबत जाण्यासाठी आग्रह धरल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळेच इम्रान खान यांना अटक ही चीनची चाल असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. तर या अटकेत इम्रान खान यांच्या बाजूनं अमेरिका उभी राहण्याची शक्यता नाकारता येणारी नाही.